सोळातास चाललेल्या मिरवणुकीने बाप्पांच्या उत्सवाचा समारोप! यंदाच्या वर्षी नागरिकांमध्ये अभूतपूर्व उत्साह; पुरोहित संघाकडून मिरवणूक मार्गाची सफाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेली बारा दिवस अबालवृद्धांमध्ये अलोट उत्साहाचा संचार करणार्या उत्सवाची शुक्रवारी सोळा तासांच्या विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली. आज पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास तानाजी मंडळाच्या मिरवणुकीतील अखेरच्या गणरायाचे अमृतवाहिनीच्या काठावर विधीवत पूजन करुन ‘बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या..’ अशी भावनीक साद घालीत विसर्जन करण्यात आले. एव्हाना गणेशोत्सवातील दहा दिवसांत अखेरच्या तीन दिवस देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी यंदा बारा दिवसांच्या उत्सवात पाचव्या दिवसापासूनच बघायला मिळाली. गुरुवारी अखेरच्या दिवशी तर शहरातील प्रत्येक रस्ता माणसांनी अक्षरशः ओसंडून वाहत होता. बाजारपेठ व्यापारी मंडळाने सादर केलेल्या ‘भूत बंगल्या’ने तुफान गर्दी खेचली, तर चंद्रशेखर मंडळाच्या ‘खाटूश्याम’ आणि चव्हाणपूर्यातील सप्तश्रृंगी मातेच्या देखाव्याने भाविकांना मंत्रमुग्ध केलं. पौराहित्याच्या पलिकडे जावून संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रातही वरचढ असलेल्या पुरोहित संघाने मुख्य विसर्जन मिरवणुकीनंतर मार्गावर साचलेल्या कचर्याची सफाई करीत आपल्या कार्यात आणखी एक अध्याय जोडला. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणुकीतील काही मंडळांनी ‘डिजे’चा वापर केला होता, त्यांच्या आवाजाची पातळीही नोंदवण्यात आली. मात्र कोणत्याही कारवाईची नोंद नाही.

संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठा वारसा आहे. पुण्यात या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवल्याच्या पुढच्याच वर्षी 1894 साली रंगारगल्लीतील सोमेश्वर महादेव मंदिरात गणेशाची पार्थिव मूर्ती स्थापित करुन हा उत्सव सुरु झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोष्टी समाजाने मेनरोडवरील चौंडेश्वरी मंदिरात, साळी समाजाने साळीवाड्यातील लक्ष्मीनारायण मंदिरात, राजस्थानी ब्राह्मण समाजाने जगदीश मंदिरात, माहेश्वरी समाजाने मेनरोडवरील बालाजी मंदिरात, ब्राह्मण समाजाने चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात, आबासाहेब वस्ताद यांच्या पुढाकारातून पहिलवानांनी नेहरु चौकात, माळी समाजाने माळीवाड्यातील मारुती मंदिरात, क्षत्रिय समाजाने नवघर गल्लीतील खंडोबा मंदिरात, कुंभार समाजाने संत गोराबा मंदिरात पार्थिव गणेशाची स्थापना करुन या उत्सवाची परंपरा पुढे नेली. त्यावेळी आसपासच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकाही टाळ-मृदूंग आणि जय जयकाराच्या गजरात गवंडीपूर्याकडून मेनरोडने प्रवरापात्राकडे जायच्या. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच हा मार्ग बायाबापड्यांनी अक्षरशः तुंबलेला असतं.

त्याचीच अनुभूती यंदाही बघायला मिळाली. वास्तवित यावर्षी बारा दिवस बाप्पांचा मुक्काम होता. त्यामुळे गेल्याकाही दशकांतील अनुभवातून उत्सवाचे शेवटचे तीन दिवस शहरातील देखावे पाहण्यासाठी गर्दी होईल असा पूर्वानुमान होता. मात्र यावेळी तो सपशेल फोल ठरला. नागरिकांनी तब्बल दोन दिवस आधी रविवारपासूनच देखावे पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळचे विशेष म्हणजे गणेशोत्सवातील शेवटचे सहा दिवस संगमनेरच्या प्रत्येक रस्त्यावर नागरिकांची अभूतपूर्व गर्दी बघायला मिळाली. लहान मुलांना प्रचंड आकर्षण असलेल्या भूतांची सिक्वेल कायम ठेवून बाजारपेठ व्यापारी मंडळाने सादर केलेला ‘भूत बंगला 2’ हा देखावा विक्रमी गर्दी खेचणारा ठरला. या देखाव्याची सोशल माध्यमातून जाहिरात पाहून उत्साहीत झालेल्या मुलांनी आपल्या आई-बापाचा पीच्छा पुरवल्याने हजारों पालक तासन् तास रांगेत उभे राहूनही मुलांसह आपल्या मनातील उत्कंठा भागवताना दिसले.

संगमनेरातील नावाजलेले मूर्तीकार सुनील मादास यांनी चव्हाणपूर्यात साकारलेल्या श्री सप्तश्रृंगी मातेसह चंद्रशेखर चौकाने सादर केलेल्या ‘खाटूश्याम’ देखाव्याने नागरिकांना मंत्रमुग्ध केले. सुतारगल्लीतील बाबा अमरनाथ, रंगारगल्लीतील श्री जगन्नाथ रथाची प्रतिकृती, साईनाथ चौकातील पद्मावती मंदिर, भारत चौकातील महालक्ष्मी मंदिर, नेहरु उद्यानाजवळील भद्रा मारुती, अशोक चौकातील कठपुतली अशा कितीतरी अतिशय कल्पक आणि आकर्षक देखाव्यांनी यंदा गणेशोत्सवाची उंची शिगेला पोहोचवली. क्रीडा संकुलाजवळील ठाकरे मित्र मंडळ, नेहरु चौक मंडळ आणि नवीन नगर रोडवरील अभिनव मंडळाने छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांवरील हृदयद्रावक मात्र अभिमानी प्रसंगांवर आधारित जिवंत देखावे सादर करीत प्रेक्षकांमध्ये स्फूरण भरले.

विसर्जनाच्या मुख्य दिवशी शुक्रवारी (ता.25) सकाळी नऊ वाजता आमदार अमोल खताळ, सत्यजीत तांबे, नगराध्यक्षा मैथिली तांबे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दूर्गा तांबे व डॉ.जयश्री थोरात-जैन आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी, सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीत पालखीत विराजमान झालेल्या मानाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली. तब्बल 12 तास चाललेल्या या मिरवणुकीने रात्री नऊच्या सुमारास पालिकेचा शासकीय सन्मान स्वीकारला. त्या पाठोपाठ मानाच्या उर्वरीत 12 मंडळांमधील आठ मंडळांसह अन्य सहा अशा एकूण 15 मंडळांनी सहभाग घेतला होता.

संगमनेरातील स्थानिकांसह विविध ठिकाणांहून मागवलेली छोल-ताशा व झांज पथके आणि काही मंडळांनी आवाज मर्यादेच्या शर्थेवर डीजेचाही वापर केला होता. दुपारी दोन वाजता मानाच्या पहिल्या गणरायाचे गवंडीपूर्याजवळ आगमन झाले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ चौंडेश्वरी, साळीवाडा, राजस्थान, चंद्रशेखर चौक, नेहरु चौक, माळीवाडा, नवघर गल्ली आणि कुंभारगल्ली अशा आठ मानाच्या मंडळांनी क्रमवार विसर्जनाच्या मुख्य मार्गावर प्रवेश केला. त्यामुळे दुपारपासूनच गवंडीपूरा ते नगरपालिकेपर्यंत मार्गावर प्रचंड गर्दी उसळली होती. मित्रप्रेम मंडळ, श्री सत्कार समिती, आमदार अमोल खताळ मित्र मंडळ, शिवसेना शाखा क्रमांक 11, साईनाथ युवक मंडळ, फे्रन्डस् सर्कल मंडळ, महात्मा फुले प्रतिष्ठान आणि नगरपालिका या ठिकाणी मिरवणुकीतील सर्व गणपती मंडळांचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि बहुतांश नगरसेवक यावेळी शेवटपर्यंत हजर होते.

रात्री बाराची मर्यादा संपल्याने सालाबादप्रमाणे टाळाच्या तालावर गणरायाचा गजर करीत आलेल्या उपासणी गल्लीतील तानाजी मंडळाच्या गणरायाची आरती करुन पालिकेच्यावतीने रात्री साडेबारा वाजता या अखेरच्या गणरायास निरोप दिला गेला. आज पहाटे सव्वा वाजता प्रवराकाठी विधीवत पूजनानंतर ‘बाप्पा, पुढच्यावर्षी लवकर या..’ अशी भावनिक साद बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आणि सोळा तास चाललेल्या मिरवणुकीने बारा दिवसांच्या या भारावणार्या उत्सवाची सांगता झाली. उत्सवाच्या बाराही दिवसांत संगमनेरसह संपूर्ण उपविभागात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणुकीदरम्यानही किरकोळ अपवाद वगळता शांतता होती. कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी एका पोलीस उपअधीक्षकासह एक पोलीस निरीक्षक, 12 सहाय्यक व उपनिरीक्षक, 102 महिला व पुरुष अंमलदार, गृहरक्षक दलाचे 35 जवान, राज्य राखीव दलाची एक कंपनी आणि सोबत पोलीस भरतीसह राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिसांनी वाहतुकीसह कायदा व सुवस्थेची उत्तम व्यवस्था केली होती.

आपल्या संघटनात्मक शक्तिचा वापर केवळ पौराहित्याच्या व्यवसायापर्यंतच न ठेवता त्याला सामाजिक कार्याची जोड देणार्या भाऊ जाखडी यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर पुरोहित संघाने मिरवणुकीनंतर संपूर्ण विसर्जन मार्गावर साचलेला कचरा स्वच्छ करण्याचा स्त्युत्य उपक्रम राबवला. आज सकाळीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ संघाचे सदस्यच नव्हेतर त्यांचे कुटुंबियही हातात खराटा आणि कचरा उचलण्याच्या सुपड्या घेवून संपूर्ण मिरवणूक मार्गाची स्वच्छता करताना दिसत होते. पुरोहित संघाचा हा सामाजिक उपक्रम संगमनेरकरांच्या हृदयाचा ठाव घेणारा ठरला.

