शेरी चिखलठाण येथील शेतकर्‍याची सात लाख रुपयांची फसवणूक वाशी फ्रूट मार्केटमधील व्यापारी पिता-पुत्रावर गुन्हा राहुरीत गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगराळ भागातील शेरी चिखलठाण येथील एका शेतकर्‍याची आठ एकर खरबुजाची वाडी घेतलेल्या वाशी (नवी मुंबई) फ्रूट मार्केटमधील व्यापारी पिता-पुत्राने शेतकर्‍याची तब्बल सात लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी राहुरी पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिनेशकुमार रामधन गुप्ता व अंकेत दिनेशकुमार गुप्ता (दोघेही रा. ओपन रोड, एपीएमसी फ्रूट मार्केट, सेक्टर 19, तुर्भे, वाशी, नवी मुंबई) अशी संशयित व्यापार्‍यांची नावे आहेत. शिवाजी सदाशिव काकडे (वय 47, रा. शेरी-चिखलठाण) असे फसवणूक झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. शेतकरी काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की चिखलठाण येथे शेतजमीन आहे. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आठ एकर जमिनीत कुंदन खरबुजाची वाडी केली. मार्च 2023 मध्ये खरबूज काढण्यास तयार झाले. चार वर्षांपूर्वी वाशी मार्केटमधील व्यापारी दिनेशकुमार गुप्ता यांना खरबूज विकले होते, तेच व्यापारी 20 मार्च 2023 रोजी त्यांचा मुलगा अंकेत समवेत चिखलठाण येथे माझ्या घरी आले. दुसर्‍या दिवशी खरबूज वाडीची पाहणी करून व्यवहार ठरला.

आठ एकर खरबुजाच्या वाडीची किंमत 15 लाख रुपये ठरली. प्रत्येक सोमवारी पाच लाख रुपये द्यायचे. तीन आठवड्यांत खरबूज काढून घ्यायचे, असा लिखीत व्यवहार झाला. खरबूज काढणीला सुरवात झाल्यावर व्यापार्‍याने पहिल्या सोमवारी पाच लाख रुपये बँक खात्यावर वर्ग केले. पुढच्या सोमवारी फक्त दीड लाख पाठवले. तिसर्‍या सोमवारी पुन्हा फक्त दीड लाख पाठविले, असे एकूण आठ लाख रुपये दिले. दरम्यान, तीन आठवड्यांत व्यापार्‍याने सर्व आठ एकरांवरील खरबूज नेले. उर्वरित सात लाखांसाठी व्यापार्‍याला वेळोवेळी मोबाईलवर संपर्क करून विचारणा केली, परंतु पिता-पुत्राने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरवात केली. व्यापार्‍याने माल नेऊन विश्वासघात केला. सात लाखांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

खरबुजाची आठ एकरची वाडी कष्टाने उभी केली. शंभर टनांपेक्षा जास्त खरबूज माल व्यापार्‍याने शेतातून काढला. व्यवहारात सात लाखांची फसवणूक केली. उधारीवर खते औषधे घेतली, वाटेकरी असून शेतीवर प्रपंच आहे. यामुळे मात्र हतबल झालो. अशाच कारणांनी शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा.
– शिवाजी काकडे (शेतकरी, शेरी-चिखलठाण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *