संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकाला बेशिस्तीचा विळखा! ठेकेदारासह आगार प्रमुखांची अनास्था; अस्ताव्यस्त वाहने आणि भिक्षेकर्यांमुळे सौंदर्य लोपले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या बसस्थानकाच्या इमारतीला बेशिस्तीचे ग्रहण लागले आहे. प्रत्यक्ष या स्थानकाचे कामकाज करतांना ठरलेल्या अनेक गोष्टी वास्तवातच उतरल्याच नसल्याने लोकसेवत रुजू होवून दशकाचा कालावधी उलटण्याआधीच या वैभवशाली इमारतीचे सौंदर्य काळवंडले आहे. त्यात गेल्याकाही दिवसांपासून बसस्थानकाच्या परिसरातच हक्काचा तंबू ठोकणार्या भिक्षेकर्यांसह बसस्थानकातील व्यापारी संकुलाशी काहीएक संबंध नसलेल्या वाहनधारकांची बेशिस्ती प्रखरपणे दिसून येत आहे. मात्र या सर्व गोष्टींचा ना कोट्यवधी रुपये कमावणार्या ठेकेदारावर परिणाम होतोय, ना आगार प्रमुखांवर. त्यामुळे चोवीस तास वर्दळीने व्यापलेल्या या परिसराची रया गेली असून आतातरी बसस्थानकाचे अधिकृत वाहनतळ खुले करुन हा परिसर भिक्षेकरी मुक्त करावा अशी मागणी होवू लागली आहे.

पुणे-नाशिक व मुंबई अशा त्रिकोणीय महानगरांच्या श्रृंखलेत वसलेल्या संगमनेर शहरातून उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणारा ‘पुणे-नाशिक’ राष्ट्रीय महामार्ग जातो. सतत वाहतुकीने ओथंबलेल्या या महामार्गावर मालवाहतुकीसह दररोज प्रवास करणार्या प्रवाशांची संख्याही खूप मोठी आहे. खान्देश, गुजरात आणि नाशिककडून पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या असंख्य बसेस असल्याने संगमनेरचे बसस्थानक बसेस आणि प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असते. काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने या बसस्थानकाचे संपूर्ण नूतनीकरण केले. त्यातून संगमनेरसाठी अतिशय भव्य आणि देखणी इमारत उभी राहिली.

या इमारतीच्या पुढीलभागात मोठ्या संख्येने व्यावसायिक गाळे उभारले गेल्याने बसस्थानक सुरु झाल्यापासूनच हा परिसर व्यापाराचे केंद्र म्हणूनही समोर आला. पुढील पाच दशकांचे नियोजन करुन आराखडा तयार झालेल्या या बसस्थानकाच्या उत्तरेला प्रशस्त भूमिगत पार्किंगची (वाहनतळ) व्यवस्थाही करण्यात आली आहे. बसस्थानकातील व्यापारी गाळ्यांसमोर त्या-त्या गाळ्यांमध्ये येणार्या ग्राहकांची तर वाहनतळात वाहने उभी करुन परगावी जाणार्या अथवा शहरात इतरत्र कामासाठी जाणार्यांसाठी पे अॅण्ड पार्क (सशुल्क) वाहनतळ असे सुरुवातीपासून नियोजन करण्यात आले होते.

प्रत्यक्षात संगमनेरच्या बसस्थानकाचे लोकार्पण होवून जवळपास दशकाचा कालावधी लोटला आहे. मात्र आजवर मूळ आराखड्यानुसार निर्माण केलेला भूयारी वाहनतळ जनतेसाठी खुला करण्यात आला नाही. याबाबत वेळोवेळी नागरिकांनी आवाजही उठवला, मात्र ना त्याला ठेकेदाराने दाद दिली आणि ना आगारप्रमुखांनी. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक कोपर्यात दुचाकी व चारचाकी वाहने दाटीवाटीने आणि अतिशय बेशिस्तपणे उभी केल्याचे दिसून येतात. त्यामुहे या देखण्या इमारतीचे सौंदर्य काळवंडले आहे. त्यातच कोविड संक्रमणात अचानक वाढलेल्या भिक्षेकर्यांनी तेव्हापासून बसस्थानकाला आपल्या हक्काचे घर समजून प्रशस्त बसस्थानकातील वेगवेगळ्या भागांवर आपला अधिकार निर्माण केला आहे.

मोठ्या संख्येने असलेले येथील भिक्षेकरी दिवसरात्र बसस्थानकाच्या वेगवेगळ्या भागात अक्षरशः ठाण मांडून बसलेले असतात. यातील अनेकांनी प्रवाशांसाठी फलाटानजीक असलेले बाकडे व्यापले आहेत, तर काहींनी चक्क प्रवाशांसाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातच आपले बस्तान मांडले आहे, त्यांच्यामुळे बस पकडण्यासाठी स्थानकात पोहोचण्याचा प्रयत्न करणार्या प्रवाशांना अडचणी येत आहेत. मात्र त्याचेही कोणाला सोयरसुतक नसल्याची स्थिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून दत्त मंदिराच्या परिसरासह मुख्य प्रवाशी प्रवेशद्वारासमोरच असंख्य रिक्षा व फळविक्रेत्यांनीही कोंडाळे घातल्याने येथील बेशिस्तीत मोठी भर पडली आहे. शहराच्या वैभवात भर घालणार्या आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेल्या या इमारतीला बेशिस्त वाहनधारक आणि भिक्षेकर्यांच्या कचाट्यातून सोडवा अशी आर्त हाक देण्याची वेळ संगमनेरकरांवर आली आहे.
