… म्हणून शिर्डी मंदिर परिसरातील ‘ते’ फलक लावले उंचावर! तृप्ती देसाई पुन्हा कधीही येऊन आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर केली तयारी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी शिर्डीचे साईबाबा संस्थान आणि गावकर्‍यांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. एक आंदोलन फसले तरी पुन्हा अचानक येऊन आंदोलन करण्याची त्यांची पद्धत पाहून शिर्डी मंदिर परिसरातील फलक उंचावर लावण्यात आले आहेत. शिवाय शिर्डीकरांनी शहरातही अनेक ठिकाणी असे फलक लावले आहेत. चार वर्षांपूर्वी शनिशिंगणापूरसंबंधी देसाई यांनी असेच आंदोलन केले होते.

शिर्डीतील मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना असणारे फलक साईबाबा संस्थानने लावले आहेत. त्यावरून हा वाद पेटला आहे. शिर्डी ग्रामस्थ, अनेक संघटना, काही भाविक, राजकीय नेते यांनीही या फलकांचे समर्थन केले आहे. तर देसाई यांच्या भूमाता ब्रिगेडचा याला विरोध आहे. त्या विरोधात गुरुवारी त्यांनी आंदोलन केले. शिर्डीत जाऊन फलक काढण्यासाठी त्या निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवून दिवसभर सुपे पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. सायंकाळी त्यांना पुण्याला पाठवून दिले. जाताना देसाई यांनी शिर्डी संस्थानच्या या सूचनेची तालीबानी फतव्याशी तुलना करीत 31 डिसेंबरनंतर पुन्हा आंदोलन करण्याता इशाराही दिला.

दुसरीकडे शिर्डीतही पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे. संस्थानसोबतच ग्रामस्थाही यासाठी सरसावले आहेत. काही संघटनाही देसाई यांच्या विरोधात उभ्या टाकल्या आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी देसाई यांनी शनिशिंगणापूरमध्ये असेच आंदोलन केले होते. तेथे शनी चौथर्‍यावर महिलांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांचे आंदोलन होते. तेव्हाही जाहीर केलेल्या तारखेला त्या सुप्यापर्यंत आल्या होत्या. तेथूनच पोलिसांनी त्यांना परत पाठविले होते. मात्र, काही दिवसांनी कोणतीही पूर्व सूचना न देता त्या शनिशिंगणापूरमध्ये आल्या आणि चौथर्‍यावर जाऊन शनी दर्शन घेतले. यथावकाश शनीशिंगणापूर देवस्थानने आपला निर्णय बदलला.

या पार्श्वभूमीवर देसाई यांनी शिर्डीतही असा प्रकार करू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. पूर्वी हे फलक खाली होते. आता ते दहा ते बरा फुटांवर बसविण्यात आले आहेत. जेणेकरून सहजासहजी तेथे कोणाचाही हात पोहचणार नाही. तेथे संस्थानचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्तही असतो. शिवाय नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातही अनेक ठिकाणी असे फलक लावण्यात आले आहेत.

देसाईंचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी शिर्डीत अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी आपण शिर्डी संस्थान आणि ग्रामस्थांच्या भूमिकेसोबत असल्याचे जाहीर केले आहे. स्थानिक भाजप-शिवसेना नेत्यांनीही संस्थानचा निर्णय योग्य असल्याचे म्हंटले आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही शिर्डी संस्थानच्या निर्णयाची बाजू घेत देसाई यांचा गैरसमज झाल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र, असा फलक लावण्याची गरज नसल्याचे म्हंटले आहे.

ब्राह्मण महासंघाची एंट्री लक्षवेधी…

या आंदोलनाच्या निमित्ताने देसाई यांच्या विरोधात शिर्डीत झालेली ब्राह्मण महासंघाची एंट्री लक्षवेधक ठरली आहे. या संघटनेचे पदाधिकारी पुण्याहून शिर्डीत आले होते. संस्थानने शिर्डीत लावलेल्या फलकांच्या रक्षणासाठी आम्ही आलो आहोत, असे ते सांगत होते. देसाई यांना सुप्यातच अडविण्यात आल्यानंतर शिर्डीत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. त्यामध्येही ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. जल्लोष करून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी तीस ते चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामध्ये स्थानिक विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबतच पुण्याहून आलेल्या ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकार्‍यांचाही समावेश आहे. लॉकडाऊननंतर मंदीर खुले करण्याच्या मागणीपासून हिंदुत्ववादी संघटनांचा शिर्डीशी संबंध वाढला असल्याचे दिसून येते. सर्वधर्मीय देवस्थान अशी ओळख असलेल्या शिर्डीत याची चर्चा सुरू झाली आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 117953

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *