मुळा खोर्‍यासह पठारभागावर धुक्याचे सावट! शेतकरी हवालदिल; महामार्गावर धुक्याची दाट चादर

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गुरुवारी (ता.2) अवकाळी पावसाने उघडीप दिली असली तरी मुळा खोर्‍यासह पठारभागावर धुक्याचे सावट निर्माण झाले आहे. सर्वत्र धुकेच धुके दिसत असल्याने शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर धुक्याची दाट चादरच पाहायला मिळाली.

पठारभागासह मुळा खोर्‍यात बुधवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसासह थंडीने शेतकर्‍यांसह मेंढपाळांची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. अनेक मेंढपाळांच्या मेंढ्यांसह कोकरु मृत्यूमुखी पडले आहेत. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत हा अवकाळी पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली असली तरी सर्वत्र धुक्याचे सावट निर्माण झाल्याने रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे.

याचबरोबर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गही धुक्यात हरवल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे अनेक चालक दिवे लावून वाहने चालवत होते. जर यापुढेही असेच धुके राहिले तर पिकांचे नुकसान होईल या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत. तर वाहनचालकही अपघाताच्या भीतीने धास्तावले आहेत.

Visits: 22 Today: 1 Total: 118819

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *