एक हजार रुपयांत ब्रासभर वाळू मिळणार : मंत्री विखे राज्याचे गौण खनिज धोरण जाहीर; मिळवायचे कसे याबाबत मात्र स्पष्टता नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात सत्ता बदल झाल्यापासून वाळूसह गौण खनिज उत्खनन बंद असल्याने त्याचा फटका बांधकामाशी संबंधीत क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. या दरम्यान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात आदर्श गौण खनिज धोरण राबवण्याबाबत वेळोवेळी वक्तव्येही केली. मात्र ती प्रत्यक्षात उतरत नसल्याने बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती, ती हटविणारी वार्ता नववर्षाच्या पहिील्याच दिवशी लोणीतून आली आहे. महसूलमंत्री विखे यांनी लोणीतील ग्रामसभेत बोलतांना सोमवारी राज्याचे गौण खनिज धोरण जाहीर झाल्याचे सांगितले. या धोरणानुसार सामान्यांना अवघ्या एक हजार रुपयांत एक ब्रास वाळू मिळणार आहे. मात्र ती मिळवण्याच्या प्रक्रियेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने धोरण जाहीर होवूनही गौण खनिज बांधकामांपासून दूरच आहे.


लोणी बुद्रुक ग्रामपंचायत दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करते. त्याप्रमाणे आज म्हसोबा मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या ग्रामसभेत बोलतांना मंत्री विखे यांनी वरील वक्तव्य केले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, विभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे, लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे आदींसी विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


नववर्षाच्या दिवशी लोणीच्या ग्रामदैवतासमोर वर्षभरातील पाऊसपाण्याचा अंदाज वर्तवण्याचीही परंपरा आहे. त्यानुसार मंत्री विखे यांच्या उपस्थितीत ग्रामपुरोहित धर्माधिकारी यांनी पंचागांचा वापर करुन मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात 20 जूला पावसाला सुरुवात होवून 5 जुलैपर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला. या कालावधीत खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर 15 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस होवून खरीपाच्या पिकांसह बाजरी, सोयाबीन जोमाने येईल. मानवी आरोग्य, रोगराई नियंत्रणात राहील. मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, पूर्वा व उत्तरा या नक्षत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. यंदाही सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यताही ग्रामपुरोहितांनी पंचागावरुन वर्तविली.


यानंतर बोलतांना मंत्री विखे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामांचा लेखा-जोखा मांडताना सध्या नगर जिल्ह्यासाठी अतिशय ज्वलंत ठरलेल्या गौण खनिज धोरणाच्या विषयाला हात घातला. आत्तापर्यंत अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याचे सांगत अव्वाच्या सव्वा किंमतीत लोकांना वाळू घ्यावी लागत. मात्र आपल्या आग्रहातून राज्य सरकारने नवीन गौण खनिज धोरण तयार केले असून त्यातून सर्वसामान्य नागरिकांना आता अवघ्या एक हजार रुपयांत एक ब्रास वाळू दिली जाणार आहे. खडी बाबतही सरकारने धोरण निश्‍चित केल्याचे सांगत या निर्णयाने राज्यातील वाळू तस्करीला आळा बसेल असेही मंत्री विखे यांनी यावेळी सांगितले.


राज्य सरकारने सोमवारी नवीन गौण खनिज धोरण जाहीर केले असले तरीही ज्या नागरिकांची बांधकामे त्यासाठी थांबली आहेत, त्यांनी वाळू अथवा खडी कशी मिळवावी? त्यासाठी काय पूर्तता करावी? कोठे करावी? कोण आणून देणार वाळू? यासारख्या प्रश्‍नांची उत्तरे मात्र अजूनही अनुत्तरीतच आहेत. पूर्वी संगमनेरात बांधकाम करु इच्छिणार्‍यांना पालिकेच्या बांधकाम परवानगीसोबतच किती वाळू लागेल याचा दाखलाही पालिकेकडून मिळायचा. त्या आधारे महसूलच्या ट्रेझरीमध्ये रॉयल्टी भरणा केला की पात्रातून वाळू उचलण्याचा परवाना मिळायचा. त्याचा वापर करुन त्यावेळी नदीकाठी थांबा असलेल्या बैलगाड्यांचा वापर करुन वाळू वाहीली जात. कदाचित राज्याने पुन्हा पन्नास वर्ष मागे जावून तेच धोरण स्वीकारले असण्याची शक्यताही आहे.

गौण खनिज, खास करुन वाळू या विषयावर जिल्ह्यातील आजी-माजी महसूल मंत्र्यांमध्ये गेल्या आठ-दहा महिन्यांपासून सातत्याने वाक्युद्ध सुरु आहे. मंत्री विखे सत्तेचा वापर करुन द्वेषभावना निर्माण करीत असल्याचे व जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा आणि विकास कामांमध्ये खोळंबा घालण्याचा प्रकार घडवित असल्याचे आरोप माजीमंत्री थोरात नेहमीच करीत असतात. त्यावर वाळू तस्करी, थोरातांचे कार्यकर्ते, कारवाया या भोवती विषय खेळता ठेवून राज्यात नवीन वाळू धोरणाबाबत मंत्री विखे यांनी वेळोवेळी भाष्य केले होते. आज लोणीच्या ग्रामसभेत राज्याने नवीन गौण खनिज स्वीकारल्याची आणि आजपासून ते राज्यात लागू झाल्याची घोषणा करीत त्यांनी सत्याची मोहोर उमटवली. शासन व प्रशासन या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करणार याबाबतची उत्सुकता मात्र कायम आहे.

Visits: 118 Today: 2 Total: 1112186

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *