संगमनेरच्या ऐतिहासिक हनुमान विजय रथाचे नूतनीकरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते केले अनावरण


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मोठे मारुती मंदिरातील शंभर वर्षांहून जास्त काळापासून हनुमान जयंतीच्या दिवशी या मंदिराची रथोत्सवाची परंपरा आहे. दरवर्षी निघणार्‍या रथाचे बुधवारी (ता.22) हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसिद्ध सनदी लेखापाल आणि विजय नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष पराग सराफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

सन 1927 ते 1929 ब्रिटीशांनी या रथोत्सवावर धार्मिक तणावाचे कारण सांगून बंदी घातली होती. मात्र 1929 साली संगमनेरच्या महिला रणरागिणींनी ब्रिटीशांची बंदी झुगारत त्यांच्याशी संघर्ष करत रथाचा ताबा घेऊन रथ गावभर मिरवून आणला आणि ब्रिटीश सरकारला या मातृशक्तीसमोर झुकावे लागले. तेव्हापासून आजपर्यंत हनुमान जयंतीच्या दिवशी रथ ओढायचा मान महिलांना असतो.

साधारण 1907 च्या सुमारास संगमनेर येथील प्रसिद्ध कलाकार सुंदर खरे मिस्त्री यांच्या कल्पकतेतून आणि कलाकारीतून संपूर्ण भक्कम सागवान, भव्यदिव्य आणि मनमोहक असा हा रथ साकार करण्यात आला होता. 100 वर्षे उलटून गेली तरी या रथाचा साचा आणि सांगाडा आजही अतिशय उत्तम स्थितीत आहे. 1992 साली रथाच्या साच्याचे काम भास्कर मिस्त्री यांनी केले होते. श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीने यावर्षी रथाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि नूतनीकरण करताना ज्या काही छोट्या-छोट्या तांत्रिक त्रुटी आठवल्या त्यात रथाचा मुख्य दांडा ज्याच्या साहाय्याने रथ वळवला जातो, शिवाय रथाचा कळस, बाजूची नक्षी जी रथाच्या सौंदर्यात भर टाकते अशा ठिकाणी कामाची विशेष गरज भासली. त्याकारणाने संगमनेरचे प्रसिद्ध आर्किटेक्ट विशाल काळे यांनी या कामात लक्ष घालून कुशल कारागीर शोधले आणि रथाचे काम मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाले होते आणि असे किचकट असणारे काम तब्बल 4 महिन्यानंतर मार्च 2023 च्या दुसर्‍या आठवड्यात पूर्ण झाले.

हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी रथाचे अनावरण करून रथ मारुतीरायच्या चरणी अर्पण करायचा निर्णय उत्सव समितीने घेतला आणि त्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अतिशय दिमाखदार सोहळा श्रीराम मंदिर प्रांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पराग सराफ, उद्योजक तथा रा. स्व. संघाचे माजी तालुका संघचालक अशोक सराफ आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपान देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रथाची डागडुजी करण्यासाठी आवश्यक असणार्‍या आर्थिक खर्चाचे नियोजन श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई आणि उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी करुन जे देणगीदार आहेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते आभाररुपी सत्कार केला. मान्यवरांचा परिचय अक्षय थोरात, प्रास्ताविक कमलाकर भालेकर, कार्यक्रमाचे निवेदन वरद बागुल यांनी तर आभार श्रीराम गणपुले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे कार्यकर्ते गिरीश देशपांडे, विनय गुणे, श्यामसुंदर जोशी, योगराजसिंग परदेशी, विनायक तांबे, योगेश मांगलकर, राम वामन, सर्वेश देशपांडे, प्रतीक जगताप, शुभम लहामगे, अनिकेत चांगले, अजित खेंगले, चेतन तारे, विलास परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *