कांदा उत्पादकांना दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान 500 रुपये द्या! आमदार बाळासाहेब थोरात; कृषीमंत्र्यांच्या विधानाचाही केला निषेध


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसाने शेतातील उभे पीक वाया गेले आहे. सोयबीन, कापूस, तूर, हरभरा, कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी 400-500 रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रतिक्विंटल 300 रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणार्‍या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान 500 रुपये करावे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्या पिकावर नांगर फिरवत आहे, भाजीपाल्यालाही भाव नाही. कांद्याने तर यावेळी शेतकर्‍यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी 1100 ते 1200 रुपये खर्च येतो. कांदा काढण्यासच क्विंटलला 300 रुपये लागतात. हा खर्च पाहता शिंदे सरकारने जाहीर केलेले 300 रुपयांचे अनुदान हे अत्यंत तुटपुंजे असून सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अर्थसंकल्पात शेतकर्‍यांवर सरकार मेहरबान असल्याचे चित्र दाखवण्यात आले, घोषणाच घोषणा करण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र हे सरकार शेतकर्‍यांना मदत देताना हात आखडता घेते हे दिसून आले आहे. संकटात असलेल्या शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. शिंदे सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करुन किमान 500 रुपये तरी द्यावेत.

‘शेतकरी आत्महत्या तर नेहमीच होतात’, असे असंवेदनशील विधान करुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांची क्रूर थट्टा केली आहे. शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहणे सरकारचे काम आहे. परंतु ते न करता सरकारमधील मंत्री शेतकरी आत्महत्यांबद्दल असे खोडसाळ विधान करतो हे निषेधार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री सत्तार यांच्या विधानाची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे थोरात म्हणाले.

Visits: 21 Today: 1 Total: 115164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *