विवाहापूर्वीच संपली सुखस्वप्ने; भावी नवरीने संपविले जीवन देवळाली प्रवरा येथील घटना; परिसरातून व्यक्त होतेय हळहळ

नायक वृत्तसेवा, राहुरी
तिचा सहा महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला. लवकरच लग्न होईल, पतीबरोबर सुखाचा संसार सुरू होईल, अशी सुखस्वप्ने तिने पाहिली. मात्र, नियतीने वेगळाच खेळ मांडला आणि क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले… आणि तिच्या आनंदाला दृष्ट लागली. शीतल राजेंद्र देठे (वय 22, रा. देवळाली प्रवरा) असे मृत तरुणीचे नाव आहे.

अवघी एक एकर जमीन असल्याने तिचे आई-वडील दुसर्‍याच्या शेतात मजुरी करतात. आजोबा गायींचा गोठा सांभाळतात. जानेवारीमध्ये शीतलचा साखरपुडा झाला. लग्नाची तयारी झाली. फक्त तारीख काढणे बाकी होते. मात्र, कुटुंबाच्या आनंदाला दृष्ट लागली. सोमवारी (ता. 12) रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान देवळाली प्रवरा येथे राहत्या घरात शीतलने विषारी औषध प्राशन केले. एवढ्यावरच ती थांबली नाही. घराच्या शेजारी असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. तिला तत्काळ लोणी येथे रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. बुधवारी (ता.14) दुपारी देवळाली प्रवरा येथे शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही. तसेच बुधवारी सायंकाळपर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

विशेष म्हणजे भावी नवरदेव पोलीस कर्मचारी आहे. तोही मुळचा राहुरी तालुक्यातीलच आहे. मात्र, नोकरीनिमित्त ठाणे (मुंबई) येथे राहतो. चांगलं स्थळ मिळालं. मुलीनं नशीब काढलं म्हणून कुटुंबातील सर्वांना आनंदाने आभाळ ठेंगणे झाले होते; मात्र या आनंदावर विरजण पडले. तिने विषारी औषध प्राशन करून गळफास घेतला. भातुकलीच्या खेळामधल्या राणीसारखा अर्ध्यावर डाव सोडून तिने जीवनयात्रा संपविली. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 150 Today: 1 Total: 1593388

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *