पाणीपट्टी वाढविल्याने शेतकरी आर्थिक संकटात

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गोदावरी डावा तट कालव्यावरील शेतकर्यांच्या पाणीपट्टीत पाटबंधारे विभागाने भरमसाठ वाढ केली असून त्याची आर्थिक झळ शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडले असून पाटबंधारे विभागाने वाढीव पाणीपट्टीचा पुनर्विचार करावा व पूर्वीच्या दराने आकारावी अशी मागणी शेतकर्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अभियंत्यांकडे केली आहे.

गोदावरी डावा तट कालव्यावरील आम्ही कायम उन्हाळी आवर्तनाचे लाभधारक शेतकरी असून पाटबंधारे विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सात क्रमांकाचा अर्ज कायम भरत आलो आहोत. तसेच आकारण्यात येणारी पाणीपट्टीही विनाविलंब भरलेली आहे. मात्र, गेल्या वर्षापासून विभागातर्फे शेतकर्यांकडून आकारण्यात येणार्या पाणीपट्टीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातून लाभधारक शेतकर्यांचे नुकसान होत असून विभागाने पाणीपट्टी दरवाढीचा पुनर्विचार करावा व पूर्वीच्या दराने आकारावी अशी मागणी प्रवीण शिंदे, अनिल लोणारी, तुषार विध्वंस, अभिजीत लोणारी, भाऊसाहेब संवत्सरकर, विजया लोणारी आदिंनी केली आहे.
