सोनईमध्ये चार दिवसांपासून रंगतोय चोर-पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ सीसीटीव्हीमध्ये चोरांचे संशयास्पद फिरणे चित्रीत; गस्त वाढविण्याची गरज
![]()
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनई गाव व वाड्या-वस्त्यांवर चार दिवसांपासून चोर-पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ चांगलाच रंगला आहे. आले आले.. घुसले.. अरे पळाले… अशा गहजबाने सर्वांच्याच झोपा उडाल्या आहेत. चोरी कुठेच झाली नसली तरी धास्ती मात्र वाढली आहे.

चार दिवसांपूर्वी आठवण कॉलनी परीसरात चार चोरटे आले होते. तेथील तीन चार घरांची पाहणी केली. मात्र, एका घरातील आवाजाने ते पळून गेले. सोमवारी (ता.7) रात्री दीड वाजता स्वामी समर्थ केंद्राजवळ पाच ते सहा चोर उभे होते. येथे शेजारी ओरडल्यानंतर चोर पळाले. संतोष निमसे, राजेंद्र बोरुडे, डॉ.गुरसळ यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांचे संशयास्पद फिरणे टिपले गेले आहे.

चार दिवसांपासून रोजच चोरटे गावात व वस्तीवर दिसत आहेत. पोलीस आणि काही युवकांनी त्यांचा पाठलाग सुध्दा केला. मात्र, कुणीही हाताला लागले नाही. चोरांच्या भीतीने अनेकांना रात्र जागून काढावी लागत आहे. गावात लाखो रुपये खर्चून लावलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. पोलीस ठाण्याचा दूरध्वनी एक वर्षापासून बंद आहे. संपर्क करूनही पोलीस वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे. येथील पोलीस यंत्रणा शोभेची वस्तू असल्याचे उघड बोलले जाते.

गावात व वस्तीवर चोरांची वर्दळ वाढली असल्याने रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. चोरी, दरोड्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आहोत. रात्रीसाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोरोना काळात लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे घरात पैसा आकडा नाही. जे थोडेफार किडून-मिडूक आहे. त्यावरही डल्ला मारला जात आहे. बहुतांशी घरात कोरोनाचे रुग्ण असल्याने घरे बंद आहेत. तर काही गावात साथ असल्याने दुसर्या गावी गेले आहेत. त्यांच्या घरांनाही कुलूप आहे. अशा घरांवर चोरट्यांकडून पाळत ठेवली जाते.

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली नाही तर सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज पाहून संशयितांना पकडावे, त्यामुळे गावकर्यांत असलेली चोरट्यांची दहशत संपेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
– रामचंद्र कर्पे (सहाय्यक, पोलीस निरीक्षक)

कॉलनीत चार ते पाच चोरटे हत्यारांसह फिरताना दिसले. ही टोळी रात्री कुलूप असलेल्या घरांचा शोध घेत असावी असा अंदाज आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे.
– डॉ.संतोष गुरसळ (ग्रामस्थ)
