गीता म्हणजे मानवजातीला वरदान देणारा ग्रंथ ः जाखडी संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने गीता जयंती साजरी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली गीता म्हणजे विश्वातील अखिल मानवजातीला जगण्याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ असल्याने वरदान ठरला आहे, असे प्रतिपादन संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचे औचित्य साधून ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गीता जयंती सोहळ्यात बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी प्रतिष्ठानचे सर्वश्री अरुण कुलकर्णी, विशाल जाखडी, सतीश वैद्य, नंदूकाका जाखडी, सागर काळे, रवीकांत तिवारी, नंदू व्यास, पवन काळे आदिंसह अनेक गीताप्रेमी उपस्थित होते. गीता ग्रंथाचे विधिवत पूजन करून पठण करण्यात आले.

‘ज्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते असा जगातील गीता हा एकमेव ग्रंथ आहे. हीच त्या ग्रंथातील विचारांची थोरवी आहे. गीतेचे अठरा अध्याय आणि सातशे श्लोक म्हणजे मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारे अलौकिक तत्वज्ञान आहे. म्हणूनच हजारो वर्षे झाली तरी या ग्रंथाची महानता आजही अबाधित आहे. गीतेतील एकेक श्लोक म्हणजे अमुल्य रत्न आहे. हताश निराश हतबल झालेल्या मनुष्याला प्रचंड आत्मबल देऊन पुन्हा जिद्दीने उभे राहण्याची शक्ती देणारी गीता चंद्र सूर्य असेपर्यंत सर्वांना प्रेरणा देत राहील. विशेष म्हणजे हल्ली युवा वर्गही गीतेच्या अभ्यासाकडे वळत आहे ही गोष्ट खूप आशादायक आहे. भारताने जगाला गीतेच्या माध्यमातून दिलेला संदेश म्हणजे विश्वबंधुत्वाची अनमोल देणगी आहे. त्यामुळे पुढेही हजारो वर्षे गीता जगाच्या कानाकोपर्यात अभ्यासली जाईल असा विश्वास आहे’ असे भाऊ जाखडी यावेळी म्हणाले.

Visits: 113 Today: 1 Total: 1105808

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *