चौघा अट्टल चोरट्यांकडून सात मोटारसायकली हस्तगत पोलिसांची संयुक्त कारवाई; एका अल्पवयीन मुलाचाही समावेश
नायक वृत्तसेवा, संगमनेर
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने 4 अट्टल मोटारसायकल चोरांना पकडत त्यांच्याकडून संगमनेर तालुक्यातून 2 आणि सिन्नर तालुक्यातून 5 अशा 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
संगमनेर शहरातील गणेशनगर येथील ओम दीपक जानमाळी यांची गणेशनगर आणि चंदनापुरी येथील किरण रोहिदास रहाणे यांची रायतेवाडी फाट्यावरील हॉटेल संकेतपासून अशा दोन मोटारसायकल चोरीला गेल्या होत्या. या दोन्ही चोरीच्या घटनांचा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तसेच यापूर्वी देखील चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी दिलेले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी संजय सातव आणि संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोकॉ. अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, सायबर सेलचे पोकॉ. फुरकान शेख, शहर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ. अमित महाजन, पोना. दत्तू चौधरी यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत संशयावरून एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने जानमाळी आणि रहाणे यांच्या दुचाकी निमगाव टेंभी येथील सुमित संजय कदम याच्या मदतीने चोरल्याची कबुली.
सदर दुचाकी मोबीन मुबारक शेख (वय 23), महंमद फरदीन नाजिर शेख (वय 21, दोघेही रा. रहेमतनगर, संगमनेर) यांना विक्री केल्या असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने त्या दोघांकडून दोन्ही मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. अधिक चौकशी केली असता पाच मोटारसायकल सिन्नर तालुक्यात विकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोबीन शेख व महंमद शेख या दोघांना सिन्नर येथे घेऊन जाऊन चार मोटारसायकली ताब्यात घेतल्या. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत असून, कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.