जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता! जिल्हा बँक निवडणूक; चंद्रशेखर घुले यांची कार्यकर्त्यांसोबत गुप्त खलबते
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
सरळसरळ विजय दिसत असतांनाही अंतर्गत फुटीमुळे झालेला पराभव जिव्हारी लागल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादीला खिंडार पाडणारी ठरु शकते. पराभूत उमेदवार, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी तसे संकेत दिले असून रविवारी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी ‘खलबते’ही केली. मंगळवारी शेवगावमध्ये त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेण्यात येणार असून त्यानंतरच घुलेंची राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे. मध्यंतरी झालेल्या सोयरीकेने राजळे कुटुंबाशी निर्माण झालेली जवळीक आणि घुले-राजळेंचा एकच मतदार संघ या पार्श्वभूमीवर घुले भाजपाशी संधान साधतील, अन्य मार्ग निवडतील की या माध्यमातून स्वपक्षावरच दबाव निर्माण करुन अन्यकाही पदरात पाडून घेतील यावर जिल्ह्यात मात्र चर्चा सुरू झाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे चौदा संचालक असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना अवघी नऊ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघर्षातून फुटलेली मते भाजपाच्या पारड्यात पडल्याने जिल्हा बँकेत अवघे सहा संख्याबळ असलेल्या भाजपाचे शिवाजी कर्डिले यांचा अवघ्या मताने विजय झाला. या निवडणुकीतील संख्याबळाचा विचार करता माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा विजय निश्चित मानला जावूनही त्यांना पराभव पहावा लागल्याने त्यांचे कार्यकर्ते व समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
या सगळ्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी रविवारी (ता.12) चंद्रशेखर घुले यांनी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, भाऊराव भोंगळे, मन्सूर फारुकी, अशोक दातीर, शरद सोनवणे, नंदकुमार मुंढे, अशोक जमधडे यांच्यासह आपल्या निवडक समर्थकांशी खलबते केली. त्यातून सगळ्यांचाच नाराजाची सूर आल्याने येत्या मंगळवारी (ता.14) शेवगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यातून आपली भूमिका जाहीर करण्याचे ठरले आहे. त्यानुसार उद्या (ता.14) सकाळी साडेदहा वाजता शेवगावमध्ये घुले समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधतांना घुले यांनी मतदार संघातील विविध प्रश्न व पुढील निवडणुकीबाबत मेळाव्यातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. यावेळी आपली पुढील भूमिकाही स्पष्ट करण्याचे संकेत त्यांनी दिले. (स्व.) मारुतीराव घुले व त्यांची दोन्ही मुले नरेंद्र व चंद्रशेखर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचे कट्टर समर्थक असल्याचे मानले जाते. 2009 साली पक्षाने नरेंद्र घुले यांच्याऐवजी चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी दिली व ते निवडून आले. पुढे 2014 साली भाजपाच्या मोनिका राजळे यांनी त्यांचा पराभव केला, तर 2019 मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारताना अॅड. प्रताप ढाकणे यांना तिकिट दिले. मात्र त्या निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला व राजळे विजयी झाल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीत ढाकणेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडून मतदारसंघात सुरू असलेली कामे व जनसंपर्कही हेच सांगणारा आहे. त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती वरील शक्यता प्रबळ करणरी आहे. तत्पूर्वी घुलेंचे राजकीय पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांच्या कुटुंबातील राजश्री घुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते, तर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संघाच्या गटातून चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी देण्याबाबतचा शब्द मिळू शकतो अशीही पक्षात चर्चा होती, मात्र जिल्हा बँकेत त्यांचा पराभव झाल्याने विधान परिषदही त्यांच्यापासून दूर गेल्याचे समजले जाते. त्यामुळे चंद्रशेखर घुले यांनी वेगळा मार्ग निवडल्यास जिल्ह्यात आश्चर्य निर्माण होणार नाही.
मध्यंतरीच्या कालावधीत घुले आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या कुटुंबात सोयरीक झाली आहे. त्यातून पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या प्रतिनिधी व विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या प्रतिस्पर्धी मोनिका राजळे यांच्याशीही त्यांचे नाते जोडले गेले आहे. त्यांची ही सोयरीक राजकीय क्षेत्रातील त्यांच्या अनेक नातेवाईकांनाही पटलेली नाही. त्यामुळे घुले आता कार्य निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे. काही वर्षांपूर्वी असाच प्रसंग गडाख कुटुंबासमोरही उभा राहिला होता. त्यावेळी शंकरराव गडाख यांनी अपक्ष उमेदवारी करतांना भाजपा उमेदवाराचा पराभव केला व उद्धव ठाकरेंच्या गटाला पाठिंबा देत मंत्रीपदही मिळवले.
मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडीतही ते ठाकरेंसोबतच ठाम उभे राहिले. आता तसाच प्रसंग चंद्रशेखर घुले यांच्यासमोर उभा राहिला असून ते गडाखांसारखीच भूमिका घेतात की भाजपात प्रवेश करुन राजळे यांच्याऐवजी उमेदवारी मागतात अथवा या सर्व घडामोडींतून आपल्याच पक्षावर दबाव निर्माण करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणार्या विधान परिषदेचे तिकिट पदरात पाडून घेतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र घुलेंच्या आजच्या भूमिकेने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले असून घुलेंना वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी एक गट काम करीत असल्याचे दिसू लागले आहे.