घाटावरील निसर्ग परिचय केंद्राचा परिसर विविध फुलांनी बहरला
घाटावरील निसर्ग परिचय केंद्राचा परिसर विविध फुलांनी बहरला
विविध रंगीबेरंगी फुले फुलपाखरांसह प्रवाशांनाही करताहेत आकर्षित
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटावर असलेले वन विभागाचे निसर्ग परिचय केंद्र सध्या रानझेंडूच्या फुलांसह विविध जातींच्या रंगीबेरंगी फुलांनी चांगलेच बहरले आहे. या फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरे मुक्तपणे बागडत असून महामार्गावरुन जाणार्या प्रवाशांनाही आकर्षित करत आहेत. जणूकाही निसर्गाने हिरवा शालू पांघरुन विविध रंगांचा साज नेसल्याचा अद्भूत अविष्कार दिसत असल्याने वनप्रेमी आणि प्राणीप्रेमी ही छबी मोबाईलच्या कॅमेर्यात टिपून घेत आहेत.

जुना आणि नवीन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या चंदनापुरी घाटावर वन विभागाने काही वर्षांपूर्वी दिमाखदार निसर्ग परिचय केंद्र उभारले आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे निसर्गाचा अद्भूत अविष्कार अनुभवयास मिळतो. हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आणि विविध जातींच्या रंगीबेरंगी फुलांमुळे बरलेला असल्यामुळे अनेक पर्यटक या निसर्ग परिचय केंद्राला भेट देवून मनसोक्त आनंद घेतात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट ओढावल्याने खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून याठिकाणी पर्यटकांना येण्यास वन विभागाने बंदी घातली आहे. सध्या रानझेंडूच्या फुलांसह विविध जातींच्या रंगीबेरंगी फुलांची झालरच दिसत आहे. वार्याच्या नाजूक झोतामध्ये झोका घेत फुलांमधील मकरंदाचा गोडवा चाखण्यासाठी विविध जातींची फुलपाखरेही मुक्तपणे बागडत आहेत. यामुळे हा निसर्गाचा अद्भूत अविष्कार संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’ या अभंगाचीच आठवण करुन देत आहे.

दरम्यान, रंगीबेरंगी फुलझाडे, फुलपाखरे हे सर्व दृश्य पाहून निसर्ग परिचय केंद्राकडे आपोपाप पर्यटकांची पावले वळू लागतात. नवीन चंदनापुरी घाट सुरू झाल्याने थोड्याफार प्रमाणातच जुन्या चंदनापुरी घाटातून वाहणे जात असतात. मात्र, अनेकांना याठिकाणी थांबून फुलांसमोर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह काही आवरत नसल्याचे दिसत आहे. यावेळी कधी रंगीबेरंगी फुलपाखरांचा मुक्त संचार, भुंगे, पशुपक्षांचा मंजूळ आवाजही कानी पडत असल्याने निसर्गही संगीतबद्ध होत असल्याचे अनुभवयास मिळते. यामुळे मन अगदी प्रसन्न होवून जाते. त्याचबरोबर या निसर्ग परिचय केंद्राच्या आवारात वन विभागाने बिबटे, लांडगे, तरस, माकड, मोर आदी वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे त्यांचा वावर देखील येथे असतो. या प्राण्यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक आसुसलेले असतात, परंतु यावर्षी कोरोना संकटाने त्यांच्या आनंदात विरजण घेतले आहे. त्यामुळे वन्यप्राणीही पर्यटकांविना मुक्तपणे संचार करत आहे.

पठारभागावर वरुणराजाची करड नजर असल्याने आणि पाणी साठवण स्त्रोत नसल्याने कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असते. परंतु यावर्षी वरुणराजाने दमदार बरसात केल्याने शेतकर्यांचा खरीप हंगाम वाया गेला. मात्र, निसर्गाच्या करिष्म्याने अख्खा पठारभाग जणू हिरवा शालू पांघरल्याचे दिसत आहे. तर निसर्ग परिचय केंद्र सातार्यातील कास पठाराचीच अनुभूती देत आहे.

