शिर्डी विमानतळावरुन लवकरच नाइट लँडिंग विमान सेवा ः कपूर विमानतळ व नागरिकांच्या समस्यांबाबत विमानतळावर अधिकार्यांची बैठक
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी विमानतळावर नाइट लँडिंग विमान सेवा सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे पथक मे अखेर येथील नाइट लँडिंग सुविधेची तपासणी करणार आहे. डीजीसीएची परवानगी प्राप्त झाल्यावर शिर्डी येथून लवकरात लवकर नाइट लँडिंग सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली.
शिर्डी विमानतळ व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी शिर्डी विमानतळावर अधिकार्यांची बैठक घेतली. शिर्डी विमानतळ प्रवेश व निर्गमन सुविधा, अग्नीशमन व्यवस्था, नाईट लँडिंग, कॉर्गो सेवा, काकडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, परिसरातील स्वच्छता अशा विविधांगी प्रश्नांचा आढावा घेऊन त्यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली.
कपूर म्हणाले, शिर्डी विमानतळ हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे विमानतळ आहे. शिर्डी येथून आत्तापर्यंत 2 लाख किलो मालाची निर्यात करण्यात आली आहे. कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बेंगळूरू, चेन्नई व दिल्ली येथे नियमित पाठण्यात येत आहे. ही सुविधा आणखी व्यापक व मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी 20 कोटी रूपये खर्चून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून कॉर्गो हब बांधण्यात येणार आहे. काकडी गावातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसोबत सखोल चर्चा करून तेथील पाण्याच्या टाकीची संपूर्णपणे डागडुजी करून दुरस्ती करण्यासाठी लवकरात लवकर निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रस्ता, शाळा, कॅन्टीन याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. विमानतळावरील विक्रेत्यांच्या अडी-अडचणी यावेळी जाणून घेऊन त्यांच्या हिताचे योग्य ते निर्णय जागेवर देण्यात आले. विमानतळावरील अग्नीशमन यंत्रणेचा आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना देण्यात आले असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली. शिर्डी विमानतळावरील प्रवेश व निर्गमन ठिकाणावरील अभ्यागत आरामदायी कक्ष सुविधेविषयी व्यवस्थापकीय संचालक कपूर म्हणाले, अभ्यागत आरामदायी कक्षामधील प्रवासी सुविधेची यावेळी सखोल पाहणी करण्यात आली. येथे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या फरशीची तत्काळ दुरूस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.