उक्कलगाव येथील तरुण व्यावसायिकाची आत्महत्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील उक्कलगाव येथील एका तरुण व्यावसायिकाने नुकतीच त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याच्या व्यावसायिक भागीदार असलेल्या मित्रांनी अपमानास्पद वागणूक देत पैशांची मागणी करत त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा उल्लेख दिसून आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

उक्कलगाव येथील गणेश गोरख थोरात (वय 35) हे राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे राहाता तालुक्यातील राजुरी येथील विठ्ठल जिजाबा मोरे व श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघचौरे यांच्या समवेत भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय करत होते. मात्र त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून हॉटेल व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीवरुन वाद होवू लागले. गणेश थोरात यांना अपमानास्पद वागणूक देत पैशांचा तगादा लावलेला होता.

या जाचास कंटाळून त्यांनी राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून त्याची तपासणी केली असता खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात पैशांचा तगादा करत मला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून विठ्ठल जिजाबा मोरे व ज्ञानेश्वर जगन्नाथ वाघचौरे या दोघांची नावे लिहिलेली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रवींद्र गोरख थोरात यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुरनं.106/2023 भादंवि कलम 306 अन्वये वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे हे करत आहेत.

Visits: 157 Today: 1 Total: 1849998

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *