14, 15 व 16 ऑगस्टला वाहतूक मार्गात बदल!
नायक वृत्तसेवा, राजूर
पावसाळ्यात भंडारदरा (ता. अकोले) परिसरातील निसर्गाचा अविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी अनेक पर्यटक भेटी देतात. या पार्श्वभूमीवर सलग येणार्या सुट्ट्या लक्षात घेऊन 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली आहे.
14 ऑगस्टला दुसरा शनिवार, रविवारी स्वातंत्र्य दिन तर सोमवारी पारशी नववर्षानिमीत्त सुट्टी असणार आहे. त्यामुळे जोडून आलेल्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. त्यादृष्टीने सध्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब आणि अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक नियमांत बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. शेंडी-भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश असणार आहे. तर एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा – वाकी फाटा – चिचोंडी फाटा – यश रिसॉर्ट – शेंडी – भंडारदरा धरण स्पील्वे गेट – भंडारदरा गाव – गुहिरे – रंधा मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता नियमावलीचे तंतोतंत पालन करणे, सर्व वाहनांची तपासणी होणार असल्याने मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी केले आहे.