सोयाबीचा पिकअप लुटणारे दोन चोरटे गजाआड तिघा साथीदारांचा शोध सुरू; श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्याचा सोयाबीन भरलेला पिकअप लुटणारे चोरटे अटक करुन 22 क्विंटल सोयाबीन येथील शहर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस पथकाने दीपक ऊर्फ डॅनी दिलीप बारसे (वय 33), मनोज लक्ष्मण सोडनार (वय 22, रा. दोघेही रा. नांदूर, ता. राहाता) यांना अटक केली असून त्यांचे फरार साथीदार गणेश शंताराम जाधव (रा. नांदूर, ता. राहाता), संदीप पारखे (रा. ममदापूर, ता. राहाता), विवेक लक्ष्मण शिंदे (वय 25, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपी बारसे व सोडनार यांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी विनोद दिगांबर साबळे (वय 36, रा. डोगर शेवली, ता. चिखली) हे पिकअप भरुन सोयाबीन विक्रीसाठी श्रीरामपूर कृषी उत्पन बाजार समितीत येत होते. त्यावेळी वरील आरोपींनी दुचाकीवर येवून टिळकनगर चौकीपासून ते टाकळीभान परिसरातील रुक्मिणी मंगल कार्यालय समोरील पुलापर्यंत साबळे यांच्या पिकअपचा पाठलाग केला. त्यातील पाहिल्या दुचाकीस्वाराने साबळे यांची बळजबरीने अडवणूक करुन सोयाबीन भरलेली पिकअप नेवाशाच्या दिशेने पळविला. तर दुसर्या दुचाकीस्वाराने साबळे यांच्याकडील साडेतीन हजर रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर साबळे यांना नेवासा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील शेती महामंडाळाच्या जागेत एकाच ठिकाणी बसवून ठेवले.

काही वेळाने पिकअपमधील 30 क्विंटल सोयाबीन काढून घेत साबळे व त्यांच्या मित्राला पिकअप जवळ सोडल्याचा प्रकार मागील आठवड्यात घडला होता. याप्रकरणी विनोद दिगांबर साबळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुप्त माहितीनुसार आरोपींचा कसून शोध घेत, दोघा आरोपींना तातडीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी सोयाबीन चोरी केल्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी चोरट्यांकडून सव्वा लाख रुपये किंमतीचा 22 क्विंटल सोयाबीन जप्त केला असून फरार दोन आरोपींचा सर्वत्र शोध सुरू आहे. तर विवेक शिंदे याला तालुका पोलिसांनी आणखी एका सोयाबीन चोरीप्रकरणी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
