नेवाशामध्ये ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा वाघ्यामुरळींकडून गजर
नेवाशामध्ये ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा वाघ्यामुरळींकडून गजर
उदरनिर्वाहासाठी अनुदान देण्याची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा गजर करत वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने वाघ्यामुरळी लोककलावंतांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नेवासा तहसीलदारांना निवेदन दिले. वाघ्या मुरळी लोककलावंतांची कोरोनाच्या महामारीत मोठी उपासमार होत असल्याने उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरूपात निधी देण्याची मागणी यावेळी वाघ्या मुरळी परिषदेचे नेवासा तालुकाध्यक्ष लक्ष्मण नजन यांनी यावेळी बोलताना केली.
शहरातील खोलेश्वर गणेश मंदीर चौकातून या वाघ्या मुरळी यांनी आपल्या ताफ्यातील मोजक्याच कलावंतांसह सामाजिक अंतराचे पालन करत वाजत गाजत खंडोबारायाची गाणी गात व येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत तहसील कचेरीवर जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी वाघ्या मुरळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भास्कर मासाळ, तालुकाध्यक्ष लक्ष्मण नजन, गंगापूर तालुकाध्यक्ष अनिल दुधे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष एकनाथ मासाळ, सर्जेराव बेडके, सागर मासाळ, सोमनाथ नजन, बाबा वाघ, संतोष पाचे, संतोष नळघे, गोपाळ नजन, आकाश पाचे, सपना मुरळी हे कलावंत यावेळी उपस्थित होते.
आम्हा सर्व कलावंतांच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, लोककलेला सरकार दरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करण्यात यावी, कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन, घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी, वाघ्या मुरळी यांना पेन्शन योजना सुरू करण्यात यावी, महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, नियमांचे पालन करून लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आले.