कोपरगाव शिक्षक बँक शाखेत लाखो रुपयांची उधळपट्टी गुरुकुल मंडळाचे घंटानाद आंदोलन; संचालकांनी राजीनामा देण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये सध्या संचालक मंडळाने खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. शेकडो संगणक खरेदी, सीसीटीव्ही व सायरन बसविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यातच कोपरगाव शाखेत गरज नसतानाही शाखा दुरुस्ती व रंगरंगोटीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी संचालक मंडळ करत आहे, असा आरोप गुरुकुल मंडळाच्यावतीने घंटानाद आंदोलनात करण्यात आला.
संचालक मंडळाची 5 वर्षांची मुदत संपून वर्ष पूर्ण होत आले आहे. संचालकांनी या वाढीव काळात आर्थिक लाभापोटी कर्मचार्यांच्या बदल्या, पदोन्नत्या केल्या. आर्थिक सौदा न जुळल्याने वरीष्ठ कर्मचार्यांना डावलून कनिष्ठ कर्मचार्यांच्या पदोन्नत्या केल्या. संचालक मंडळातील काही संचालक म्हणतात या लाखो रुपयांच्या निविदा आम्हांला न विचारता काढल्या आहेत. ही बाब बँकेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची आहे. अशा अवस्थेत संचालकच जर अंधारात असतील तर बँकेत कोट्यवधीचा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हे सर्व आर्थिक निर्णय थांबवून मनात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर सर्व संचालक मंडळाने त्वरीत राजीनामे द्यावेत. अन्यथा भविष्यात गुरुकुल मंडळ व शिक्षक समितीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय नळे, गुरुकुल मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव मोहिते, गुरुकुल मंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक कानडे, श्रीराम तांबे, संजय महानुभाव, सीताराम गव्हाणे, बाळासाहेब हरकल, अप्पासाहेब चौधरी, दत्ता गरुड, संजय खरात, लक्ष्मीकांत वाडीले, बबन कोकाटे, सुनील गाडेकर, सुनील गायकवाड, बाळासाहेब घाडगे, प्रमोद जगताप, वाल्मिक नीळकंठ, कैलास वाघ, मुब्बशीर खान, लतीफखान पठाण, श्रीकांत साळवे, सुनीता मोरे, मंगल गोपाळे, कैलास साळगट, प्रताप वळवी, ज्ञानेश्वर सैंदाणे, नंदू दिघे, अंकुश चव्हाण, संदीप नंदेश्वर आदिंनी दिला आहे.