कोवळे जीव उमलण्याआधीच धुरात कोमजले… भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू
भंडारा, वृत्तसंस्था
शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली आहे. सगळे मध्यरात्री निद्रिस्त असताना काळाने ठाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतलं. भंडार्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशू केअर यूनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने अवघा महारष्ट्र सुन्न झाला आहे.
भंडार्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर यूनिटमध्ये शॉर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली. बॉर्न यूनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकार्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली. माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन यूनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न यूनिटमधील 10 नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरडाओरडा सुरू झाला. मयत बालकांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांची बैठकही झाली आहे. दरम्यान, मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त करुन, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.
भंडार्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचेही आदेश दिले.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.