चितळवेढेतील विद्यार्थ्यांचा गटशिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयात ठिय्या पदवीधर शिक्षक देण्याची मागणी; पालकांनीही घेतला होता आक्रमक पवित्रा

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या दीड वर्षांपासून चितळवेढे गावातील जिल्हा परिषद शाळेत सात वर्गांना केवळ तीन शिक्षक असून पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे. गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी डोळेझाक केल्याने कोणतीही पूर्वसूचना न देता पालक व विद्यार्थी यांनी गटशिक्षणाधिकार्यांच्या कार्यालयात येऊन सोमवारी (ता.8) ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी आम्हांला शिक्षक मिळालेच पाहिजे, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून बाहेर जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता तर पालकांनीही कठोर भूमिका घेत गटशिक्षणाधिकार्यांना धारेवर धरले.

याप्रसंगी बोलताना पालक बाळासाहेब आरोटे म्हणाले, गटशिक्षणाधिकार्यांना वेळोवेळी अर्ज, विनंत्या केल्या. मात्र त्यांनी तब्बल दीड वर्षे लक्ष दिले नाही की वरिष्ठांना देखील कळविले नाही. त्यामुळे आमचे विद्यार्थी यापूर्वी कोरोना असल्याने शाळेत गेले नाहीत. आता शाळा सुरू होऊन तीन महिने उलटूनही अद्याप पदवीधर शिक्षक नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. तर पालक चंद्रशेखर आरोटे यांनी मराठी शाळा टिकल्या पाहिजे म्हणून आम्ही इंग्रजी शाळेतील विद्यार्थी मराठी शाळेत आणले, शिक्षकांना लोकवर्गणीतून पगार दिले. मात्र शिक्षण विभाग विद्यार्थी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा इशारा दिला.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी मला शिक्षक नसल्याचे माहीत नाही, पण तातडीने वरिष्ठांना अहवाल पाठवून शिक्षक देण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले. मात्र ग्रामस्थांचे समाधान झाले नाही त्यांनी गटविकास अधिकार्यांना भेटून प्रश्न सोडविण्याची विनंती केली. यावेळी यूवराज निरगुडे, संजय अरोटे, योगेश आरोटे, नीलेश आरोटे, किसन मोहटे, सागर आरोटे, जीवन सोनवणे, सचिन आरोटे आदी उपस्थित होते.

आमच्या शाळेत शिक्षक नसल्याने आमचा अभ्यास होत नाही. त्यामुळे आम्हांला शिक्षक मिळावा म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी कार्यालयात आलो आहेत.
– आरुषी आरोटे (विद्यार्थिनी)

चितळवेढे गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याचे विद्यार्थी व पालकांनी सांगितले आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने त्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून शेजारील गावचा एक शिक्षक आम्ही उद्यापासून देत आहोत. त्यामुळे तात्पुरता हा प्रश्न मिटला आहे.
– आर. के. शेळके (गटविकास अधिकारी)
