नान्नज दुमालातील तरुण सलून व्यावसायिकाची आत्महत्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे सखोल चौकशीची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील नान्नज दुमाला येथील जयवंत विलास कडवे (वय २२) या तरुण सलून व्यावसायिकाने शुक्रवारी (ता.१८) आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आईसह नातेवाईकांनी केला असून, संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे चौकशीच्या मागणीबाबत निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, नान्नज दुमाला येथे जयवंत विलास कडवे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. दरम्यान, शुक्रवारी जयवंतने राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे मामा रवींद्र भाऊसाहेब वाघ यांना संतोष सुखदेव वाघ यांनी फोनवरुन कळविले. ते तत्काळ संगमनेर बसस्थानकावरुन घरी परतले. त्यानंतर त्याला खाली घेऊन खासगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. त्यावरुन संगमनेर तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
परंतु, मयत जयवंतला आत्महत्या केली त्याच दिवशी गावातीलच एका मित्राने आर्थिक देवाणघेवाणीतून मारहाण केली. शिवाय सतत त्रास द्यायचा. याला वैतागून अखेर जयवंतने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. यावरुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आईसह नातेवाईक आणि नाभिक समाज बांधवांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच गावातील सीसीटीव्ही फूटेज तपासावे, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनावर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, कचरु भालेकर, संजय बिडवे, प्रकाश बिडवे, खंडू वाघ, रावसाहेब वाघ, लक्ष्मण वाघ, संतोष बिडवे, वैभव बिडवे, गोरख शिंदे, सतीष वाघ, गोरक्षनाथ मदने, प्रकाश बिडवे, रमेश सस्कर आदिंच्या सह्या आहेत.