अकोले-देवठाण रस्त्याचे काम अपूर्ण; ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य वाहनचालकांना करावी लागतेय कसरत तर अपघातांनाही मिळतेय निमंत्रण
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले ते देवठाण रस्त्याचे काम वाघोबानगरपासून वीरगाव फाट्यापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र, अकोले शहर ते वाघोबानगर आणि वीरगाव फाटा ते देवठाण रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यातच सध्या पावसाळा सुरू असून ठिकठिकाणी खड्डे असल्याने पाणी साचून चिखल तयार होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अकोले-देवठाण रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. अकोलेत शिक्षण घेण्यासाठी आढळा खोर्यातील असंख्य विद्यार्थी दररोज येत असतात. याचबरोबर दवाखाना, शासकीय कामकाज, बँक आणि शेती साहित्य खरेदीसाठी नागरिकांची देखील नेहमीच वर्दळ असते. तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे तरुण देखील याच रस्त्यावरुन जात असतात. तत्पूर्वी या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी आंदोलन, मोर्चे काढून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वाघोबानगरपासून वीरगाव फाट्यापर्यंत पूर्ण झाले. मात्र, शहर ते वाघोबानगर आणि वीरगाव फाटा ते देवठाण रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
नवीन रस्ता हा मजबूत व रुंद झाला आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, शहर ते वाघोबानगर आणि वीरगाव फाटा ते देवठाण रस्त्यावरुन प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अपघातही घडतात. तर वाहनचालकांमध्येही वाद होतात. त्यातच आता पावसाळा सुरू असून खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल तयार होत आहे. त्यामुळे येथून जाताना वाहनचालकांसह वाटसरुंना मोठी कसरत करावी लागत आहे. खरेतर पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित होते. परंतु, पूर्ण न झाल्याने प्रवाशांना चिखलातून प्रवास करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे.