श्रीरामपूर पालिकेचा थकबाकी वसुलीसाठी ढोलताशाचा गजर थकबाकीदारांना गुलाबपुष्प देऊन केले भरण्याचे आवाहन


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एकीकडे देशाचा अर्थसंकल्प सादर करीत असताना दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी ढोल-ताशाचा गजर, हातात फलक व गुलाबपुष्प घेत निघालेले पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, असे विरोधाभासी चित्र बुधवारी (ता.1) श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर होते. पालिकेकडून मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्यासाठी शहरातील नागरिकांची या माध्यमातून जनजागृती केली जात होती.

वाढलेल्या थकबाकीमुळे तिजोरीत खडखडाट झाल्याने पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहरातील नागरिकांची मालमत्ता व पाणीपट्टी कर भरण्याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली. याचाच एक भाग म्हणून ढोल-ताशांच्या गजरात थकबाकीदारांची भेट घेत त्यांना गुलाबपुष्प देऊन थकबाकी भरण्याचे आवाहन केले. तसेच 15 फेब्रुवारीअखेर कर न भरल्यास नळजोड खंडित करणे, मालमत्ता सील करणे, जप्त करणे व वेळ पडल्यास जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

याबरोबरच शहरातील प्रमुख चौकांमध्ये फलकाद्वारे थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, करनिरीक्षक सोफिया बागल, शहर अभियंता राम सरगर, विद्युत अभियंता अभिजीत ताम्हाणे, लेखापाल रमेश निकाळे, कार्यालय निरीक्षक धनंजय कवीटकर, ग्रंथपाल स्वाती पुरे, अंतर्गत लेखापाल जयश्री सायखेडे, सहायक लेखापाल शुभम रोकडे, सहायक करनिरीक्षक तुषार सुपेकर, नगर अभियंता अनंत शेळके, वसुली विभागातील कर्मचारी गोरख दौंडे, संतोष पडांगळे, नितीन पवार आदी उपस्थित होते.

Visits: 150 Today: 2 Total: 1111294

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *