बागेत वावरल्यागत ट्रॅक्टर चालवणार्‍यावर गुन्हा दाखल! अलिशान वाहनाचे मोठे नुकसान; तिघांच्या दुखापतीलाही ठरला कारणीभूत


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून ऊसाची वाहतूक करणारे बहुतेक चालक मनमौजी असल्याने त्याचा फटका आजवर सामान्य प्रवाशांना वारंवार बसला आहे. अशाप्रकारच्या धोकादायक मात्र बिनधास्त सुरु असलेल्या ऊस वाहतुकीने अनेकांना अपघात झाला असून राज्यात आजवर शेकडो निष्पापांचे बळीही गेले आहेत. मात्र केवळ सदरची वाहतूक ज्या कारखान्यांसाठी होते ती मंडळी राज्याचे नेतृत्त्व करणारी असल्याने आजवर कोणीही अशा धोकादायक वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यास धजावलेले नाही. त्यामुळे राज्यात निष्पापांचे बळी जाण्याच्या घटना सुरुच असून बुधवारी अशाच एका अपघातात तिघे जखमी झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा विचित्र अपघात बुधवारी (ता.1) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील राजापूर शिवारात असलेल्या कृष्णा लॉन्सजवळ घडला. यावेळी ऊस भरुन नाशिकच्या दिशेला जात असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या (क्र.एम.एच.18/बी.एक्स.2168) चालकाने राजापूर शिवारातील पुणे-नाशिक महामार्गावर आपण जणू बागेतच हुंदडत असल्याप्रमाणे अचानक मनमौजी पद्धतीने वळण घेतले. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या अलिशान स्कोडा कंपनीच्या कारवरील चालकाचा गोंधळ उडाला.

तोपर्यंत आपण बागेत नव्हेतर चक्क पुणे-नाशिक या प्रचंड वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर असल्याची जाणीव झाल्याने सदरील ट्रॅक्टरचालकाने पुन्हा ट्रॅक्टर सरळ करण्याचा आणि रस्ता दुभाजकाच्या बाजूने दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याच्या मुर्खपणामुळे तो डावीकडे जात असल्याचे समजून कारच्या चालकाने दुभाजकाच्या बाजूने आपले वाहन काढून घेण्याचा प्रयत्न केला, रस्त्यावरील या घडामोडी हेरुन वाहन चालविल तो ट्रॅक्टर चालक कसला यानुसार त्याने पाठीमागून येणार्‍या कारकडे सपशेल दुर्लक्ष करीत आपला ट्रॅक्टर दुभाजकाकडे दाबला, मात्र त्याचवेळी त्याच्या ट्रॉलीने सदरील कारलाही आपल्या झपाट्यात घेत दुभाजकाच्या मध्येच दाबले.

त्याचा फटका सदरील कारमध्ये पुढच्या सीटवर चालकाशेजारी बसलेल्या योगेश बाळासाहेब पवार (रा.निफाड) या तरुणाला बसला आणि त्यात तो गंभीर जखमीही झाला. त्यावरही ट्रॅक्टरचालक आपल्याच मस्तीत असल्याने त्याने काहीअंतर त्या कारला अक्षरशः फरफटत नेले. चूक लक्षात येताच त्याने भर रस्त्यात ट्रॅक्टर उभा करुन तेथून धूम ठोकली. असापाच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत लागलीच बचावकार्य करीत जखमी झालेल्या तिघांनाही वाहनातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिराने याबाबत चांगदेव माधव रोटे (रा.पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक संगमनेर गोरख गवळी (मूळ रा.मांढळ, जि.धुळे, ह.मु.घारगाव) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 279, 337, 338, 427 सह मोटर वाहन कायद्याचे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जखमी इसमांवर प्राथमिक उपचारानंतर ते नाशिककडे रवाना झाले आहेत. या प्रकरणाचा तपास हवालदार खाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 115432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *