ग्रामीण भागातील ऊर्जेच्या गरजेचे वेगळेपण लक्षात घेणे आवश्यक ः डॉ. मोहोड संगमनेर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भारतीय अक्षय ऊर्जा दिवस साजरा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारताची ऊर्जेची गरज भागवताना प्रामुख्याने ग्रामीण भागातील ऊर्जेच्या गरजेचे वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या शेतकी अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अतुल मोहोड यांनी केले.
20 ऑगस्ट हा दिवस भारतीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून 2004 सालापासून भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजरा करण्यात येतो. संगमनेर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे हा अक्षय ऊर्जा दिवस एका विशेष परिसंवादाद्वारे साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. मोहोड यांनी ‘सौर ऊर्जा’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शेती अवजारांना आवश्यक असलेल्या पारंपरिक वापरातील ऊर्जेची माहिती देऊन सदर पूरक ऊर्जा सूर्यापासून विविध पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण करून वेगवेगळ्या प्रकारे योग्यप्रकारे कशी वापरता येऊ शकेल याविषयी शास्त्रशुद्ध मांडणी त्यांनी केली. त्याचबरोबर भारतीय शेतकी विद्यापीठातील याबाबतच्या सुरू असलेल्या विविध संशोधनांची माहिती दिली. महाविद्यालये समाजात ऊर्जा साक्षरता निर्माण करण्याची मोठी भूमिका निभावत असून असे उपक्रम विद्यार्थ्यांना ऊर्जा क्षेत्रांतील नवोपक्रम उभारणीसाठी महत्वाचे असल्याचेही शेवटी डॉ. मोहोड यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजयकुमार दळवी यांनी भारतभर सुरू असलेल्या नवीनतम ऊर्जा स्त्रोत निर्मितीमुळे युवकांना रोजगाराची संधी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दहा वर्षात पारंपारिक ऊर्जेच्या वापरामुळे निर्माण होणार्या घातक उत्सर्जनाचे प्रमाण किमान तीस टक्क्यांपर्यंत कमी करणे आणि भारताची तीस ते चाळीस टक्के ऊर्जेची गरज ही खनिज तेलविरहित अशा अपारंपरिक आणि नवीनतम ऊर्जा स्रोत अधिकाधिक प्रमाणात निर्माण करून देशाला ‘ऊर्जा निर्भर’ बनवण्याची महत्वाकांक्षी घोषणा केलेली आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात युवकांना उत्तम भवितव्य असल्याने अशाप्रकारच्या विषयांचा आपल्या स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात प्राधान्यक्रमाने समावेश करत असल्याचे सांगितले. सदर परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. साईनाथ नवले यांनी तर आभार प्रा. डॉ. संदीप आरोटे यांनी मानले. सदर उपक्रमासाठी विभागाचे पदवी आणि पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. या उपक्रमास शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.