व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्वयंशिस्त आणि नियोजन महत्त्वाचे ः थोरात श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात ‘व्यक्तिमत्त्व विकासा’वर व्याख्यान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात उत्तुंग आणि दैदीप्यमान यशाची प्राप्ती व्हावी, याकरिता विद्यार्थी दशेपासूनच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास, आहार, व्यायाम अशा महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी वेळेचे योग्य नियोजन करणे आणि स्वयंशिस्त अंगी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. स्वयंशिस्त आणि नियोजनबद्ध असे सर्वगुण संपन्न विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवण्यास सक्षम होऊ शकतो, असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात यांनी केले.

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात बारावी कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ, कला शाखा समन्वयक डॉ. मारुती कुसमुडे, वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. राजाराम चत्तर आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता नेहमी सजग असावे. क्रमिक पुस्तकांबरोबरच संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करणे. शिकविलेले पडताळून पहायला शिकणे. साने गुरुजी, तुकाराम महाराज, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून विविध विचार, गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे. त्याच बरोबर मी कोण आहे? माझ्या आई-वडिलांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? त्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत का? याचे चिंतन करायला हवे. पिझ्झा, बर्गर अशा फास्ट फुडचा आहारात समावेश करण्यापेक्षा आपल्या सकस आहाराकडे लक्ष द्यावे. नियमित अभ्यास, सकस आहार याबरोबरच विविध मैदानी खेळ, व्यायाम यांनाही दैनंदिन जीवनात महत्व द्यावे. रोज सूर्योदयापुर्वी उठणे, योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम करणे गरजेचे आहे. कारण स्वास्थ्य म्हणजे मन-मेंदू-शरीर, विचार आणि कृती यांची योग्य सांगड आहे, असे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात म्हणाले. प्रास्तविक व अतिथींचा परिचय पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. भारती कडू तर आभार डॉ. मारुती कुसमुडे यांनी मानले.

Visits: 151 Today: 2 Total: 1854536

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *