जय श्रीरामच्या जय घोषाने अवघे संगमनेर दुमदुमले! हिंदुत्त्ववाद्यांची अभूतपूर्व मिरवणूक; चौकाचौकात नागरिकांची मोठी गर्दी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल दोन वर्षांनंतर सार्वजनिक पातळीवर साजर्‍या झालेल्या श्रीराम नवमी उत्सवाची रविवारी संगमनेरात धूम पाहायला मिळाली. शहरातील विविध मंदिरे आणि सार्वजनिक उत्सव मंडळांद्वारा सकाळपासूनच चौकाचौकात स्पीकरवर श्रीराम नामाची धुन वाजवली गेल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. विश्व हिंदु परिषदेसह त्यांच्याशी संलग्न असलेल्या अन्य हिंदुत्त्ववादी संघटनांनी सायंकाळी शहरातून शोभायात्राही काढली होती. या शोभायात्रेचे चौकाचौकात झालेले स्वागत आणि सहभागी रामभक्तंची मोठी उपस्थिती यामुळे संगमनेरचे वातावरण भक्तिमय झाले होते.

संगमनेर शहरातील धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्राला मोठी पंरपरा लाभली आहे. परकीय राजवटीच्या काळातही येथील धार्मिक उत्सवांमधील उत्साह खळाळत वाहत असल्याचे अनेक दाखले इतिहासाच्या पानांत आहेत. येथील श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सवालाही मोठी परंपरा लाभली आहे. पूर्वी संगमनेरात एकमेव असलेल्या चंद्रशेखर चौकातील प्राचीन श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कामही पूण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळात झाले होते. त्यावरुन येथील उत्सवांची पुरातन परंपरा अधोरेखीत होते.

गेल्या दीड दशकांपासून संगमनेरातील विश्व हिंदू परिषदेसह त्यांच्या संलग्न असलेल्या विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून श्रीरामनवमीच्या निमित्ताने शहरातून शोभायात्रा काढली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोविड संक्रमणाचे सावट असल्याने या उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र गेल्या 1 एप्रिलपासून शासनाने अपवाद वगळता कोविडच्या अनुसरुन असलेले सर्व निर्बंध मागे घेतल्याने दोन वर्षांनंतर संगमनेरातील विविध सण-उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे होत आहेत. रविवारी श्रीरामनवमीचा उत्सवही अशाच भक्तिभावाने आणि अलोट उत्साहाने साजरा करण्यात आला. दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मानिमित्ताने शहरातील सर्वच मंदिरांमध्ये भजन-कीर्तनाचा आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ सुमधूर भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याच दरम्यान सायंकाळी सहा वाजता अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्राही काढण्यात आली. सनई-चौघडांचा नाद, पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेल्या तरुणी, त्या पाठोपाठ महाराष्ट्राची पंरपरा असलेला भगवा फेटा बांधून सहभागी झालेली स्त्री शक्ति, पारंपरिक वाद्य, मोठ्या संख्येने सहभागी तरुणाई, रामायणातील विविध पात्रांची वेशभूषा केलेली बालमंडळी, गोसंरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारा देखावा, दशावतार, श्रीरामचंद्रांची प्रतिमा आणि शेवटी लेझर द्वारा पडद्यावर साकारल्या जाणार्‍या विविध देवी-देवतांच्या प्रतिमा असे या शोभायात्रेचे स्वरुप होते.

नवीन नगररोड, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, चावडी चौक, मेनरोड, सय्यदबाबा चौक, तेलीखुंट, नेहरु चौकातून चंद्रशेखर चौक या मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेचे चौकाचौकात नागरीकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. मिरवणुकीच्या मार्गावर अनेकांनी स्वयंस्फूर्तीने सडा-समार्जन करुन रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तर मिरवणूक मार्गावरील सार्वजनिक उत्सव मंडळांनी श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासह सहभागी मंडळींसाठी जलपानाचीही व्यवस्था केली होती. अतिशय जल्लोशपूर्ण वातावरणात निघालेली ही शोभायात्रा पाहण्यासाठी संगमनेरकरांनी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. रात्री दहाच्या सुमारास ही मिरवणूक चंद्रशेखर चौकात पोहोचल्यानंतर श्रीरामचंद्रांची सामूहिक महाआरती होवून या उत्सवाची सांगता झाली.


संगमनेर शहरातील गणेशनगरमध्ये क्रांतीवीर प्रतिष्ठान व छावा प्रतिष्ठानच्यावतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीवीरचे अध्यक्ष गिरीश पुंड, अभिजीत पुंड तर छावाचे प्रदेशाध्यक्ष विकास पुंड, कार्तिक पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. यावेळी शिवतांडव ढोल-ताशा पथकाने रामभक्तांची मने जिंकली. तसेच गणेशनगर तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष मनोज पुंड यांनीही श्रीराम नवमी उत्साहात साजरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *