महिनाभरात अपघातांत तब्बल सात जणांचा बळी! पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची श्रृंखला सुरूच..

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर महिनाभरामध्ये अपघातांत तब्बल सात जणांचा बळी गेला आहे. यामध्ये अनेकांच्या कुटुंबातील कमावते सदस्य गेल्याने आधारच गेला आहे. तर अनेक मुले पोरके झाले आहेत. यास अतिवेग, मोबाइलवर बोलणे, सीटबेल्ट न वापरणे, हेल्मेट न वापरणे हे मुख्यत्वे कारणीभूत ठरले आहेत. यामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना फोल ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे.

दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत लक्षणीय भर पडत असल्याने जुना महामार्ग वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत होता. यामुळे अपघातांची संख्याही काही कमी होण्याचे नाव घेईना. अखेर सरकारने नव्या महामार्गाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपूर्वी नवीन महामार्ग तयार करण्यात आला. यातून प्रवास अधिक सुखकर व वेळेत होईल अशी अपेक्षा होती. परंतु, निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांमुळे महामार्गावरील अपघात सुरूच राहिले. चंदनापुरी घाटातही पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. अनेकदा वाहतूक विस्कळीत होण्याचा प्रसंग उद्भवतो.

ऐन दिवाळीमध्ये बोटा शिवारात भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली होती. यात वडील व मुलगा जागीच ठार झाले होते. तर पत्नी गंभीर जखमी झाली होती. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे अपघातात संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले. त्यानंतर अपघातांची मालिका सुरूच राहून बोटा शिवारातच भरधाव वेगातील कारने महामार्ग ओलांडणार्‍या वृद्धास जोराची धडक दिली. यामध्ये खरमाळ येथील वृद्धाचा मृत्यू झाला. चंदनापुरी घाटातही अनेक वाहनचालकांचे नियंत्रण सुटून वाहने पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संगमनेरहून बोट्याच्या दिशेने जाणारी महामार्गाच्या कडेला असलेल्या मोठ्या दगडांवर उलटली. केवळ दैवबलवत्तर असल्याने कारचालक बचावला. पुन्हा अशाच पद्धतीने संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जाणारी कार चंदनापुरी घाटातच खोल दरीत कोसळली. मात्र, या अपघातातही दोघेजण बचावले.

यानंतर मंगळवारी (ता.23) वरुडी फाट्यापासून काही अंतरावर संगमनेरच्या दिशेने येणार्‍या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागेवर दोघा सख्ख्या भावांचा अंत झाला. तर तिसर्‍या चुलत भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे तळेगाव दिघे गावावर शोककळा पसरली. पापा अब्दुलकरीम मणियार (वय 30), अन्सार अब्दुलकरीम मणियार (वय 32) व समीर अहमद मणियार (वय 27) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनांवरुन वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

डोळासणे महामार्ग मदत पोलीस केंद्राच्या हद्दीत महिनाभरात छोटे-मोठे अपघात होवून सात जणांचा बळी गेला आहे. वारंवार जनजागृती करुनही दुचाकीवरुन प्रवास करणारे अनेकदा हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच तिघे तिघे एकाच वाहनावरुन प्रवास करत असल्याचेही दिसून आले. दोन अपघात हे महामार्ग ओलांडताना झाले आहे. कारचालकही वेगमर्यादा ओलांडत असल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन सुरक्षित प्रवास करावा.
– भालचंद्र शिंदे (पोलीस उपनिरीक्षक – डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्र)

Visits: 10 Today: 1 Total: 114808

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *