बारी गावाला ग्रामसेवक नसल्याचे विकास आराखडा ‘जैसे थे’! यापूर्वीच्या विकासकामांत गैरकारभार; सरपंचांनी फेटाळले आरोप

नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर असलेल्या बारी गावात गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने गावचा विकास आराखडा ‘जैसे थे’ असल्याचे समोर आले आहे. तर यापूर्वी झालेल्या विकासकामांत गैरकारभार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र सरपंच व ग्रामसमितीचे अध्यक्ष यांनी हे आरोप नाकारले आहे.

अकोले तालुक्यातील बारी गावात गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. स्मशानभूमी सुशोभीकरण, चावडी दुरुस्ती, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, शौचालय, पाणी पुरवठा विस्तारीकरण, स्वच्छ भारत मिशन, पेसा निधी, 14-15 वा वित्त आयोग निधी खर्च दाखविला. मात्र कामे ठप्प असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी प्रशांत वाबळे यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता ते चार महिन्यांपासून गावात आले नाही. नंतर त्यांनी बदली करून घेतली. त्यांच्या जागेवर लिंबाळे ग्रामसेवक आले मात्र तेही आठ दिवसांत निघून गेले. सध्या भंडारदरा ग्रामसेवकाकडे अतिरिक्त कार्यभार आहे. मात्र तेही दोन महिन्यांपासून फिरकले नाहीत.

परिणामी लाखो रुपयांचा विकास निधी टोपीखाली दडला असून एकच ठेकेदार काम करीत असून त्यातही गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मंगळा खाडे, देवेंद्र खाडे, गणेश खाडे यानी आरोप केले असून गटविकास अधिकार्यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली आहे. मात्र सरपंच आणि ग्रामसमितीचे अध्यक्ष यांनी हे आरोप फेटाळले असून ग्रामसेवक नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

गेली सहा महिने ग्रामसेवक नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. यापूर्वी झालेल्या विकासकामांतही अनियमितता आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर असलेले कळसूबाई मंदिरात दरवर्षी लाखो भाविक येतात त्यांच्या सोयी-सुविधांसाठी नियोजन नाही. अंगणवाडी व ग्रामपंचायत भक्त निवासमध्ये भरते. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी.
– गणेश खाडे (ग्रामस्थ)
