श्रीरामपूरचा ‘कट्टा’ विक्रेता तालुका पोलिसांच्या सापळ्यात! राष्ट्रपतींच्या दौर्‍यामुळे सतर्कता; गोपनीय माहितीच्या आधारावर थरारक कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी आणि हॉटेल, लॉजे्ससह संशयित ठिकाणी छापे घालून बुधवारी झाडाझडती घेतली. या कारवाई दरम्यान संगमनेर तालुका पोलिसांना मिळालेल्या खबरीवरुन वडगाव पान शिवारात सापळा लावला गेला. यावेळी वडगाव फाट्याच्या काही अंतरावर संशयित इसम समोर दिसताच एकमेकांना इशारत झाली आणि एकाचवेळी चोहोबाजूंनी ‘तो’ वेढला गेला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या थरारक कारवाईत श्रीरामपूरच्या अजीम उर्फ अजू अन्वर पठाण या ‘हिस्ट्रीसीटर’ आरोपीच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन काडतुसेही हस्तगत करण्यात आली. सदरचा कट्टा आपण विक्रीसाठी घेवून जात असल्याचे त्याने चौकशीत सांगितल्याने याप्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (ता.३०) शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्हाभर नाकाबंदी करण्यासह हॉटेल, लॉजेस् आणि सार्वजनिक ठिकाणी झाडाझडती घेवून संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शालोमन सातपुते सहकारी हवालदार डमाळे, डाके, सारबंदे आदी वडगाव पान शिवारातील हॉटेलची तपासणी करीत असतानाच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली.

त्यांनी तत्काळ वडगाव पान शिवारात असलेल्या आपल्या पथकाला माहिती देवून संशयिताला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी समनापूरकडून वडगाव पान फाट्याकडे येत असल्याची माहिती असल्याने सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्याच्या दुतर्फा पांगून पोलिसांनी येणार्‍या प्रत्येकाकडे संशयाने पाहायला सुरुवात केली आणि अवघ्या शंभर मीटरच्या अंतरातच त्यांची नजर नेमक्या इसमावर खिळली. हाताच्या बोटांनी, डोळ्याच्या हालचालीतून एकमेकांना इशारत होताच एकाचवेळी चोहोबाजूंनी त्याला वेढा पडला. अचानक उभ्या राहिलेल्या या प्रसंगातून गडबडलेला संशययित आरोपी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच हवालदार डमाळे यांनी पाठीमागील बाजूने पवित्रा घेत त्याला कवळी मारली.

आरोपीकडे गावठी कट्टा असल्याची व तो कधीही त्याच्यातून गोळी झाडण्याची दाट शक्यता असतानाही उपनिरीक्षक शालोमन सातपुते यांनी नीडरपणे त्याच्या श्रीमुखात वाजवून दुसर्‍याच क्षणी त्याच्या कंबरेला हात घातला. कंबरेच्या बेल्टमध्ये पद्धतशीर खोचून ठेवलेला गावठी कट्टा जेव्हा त्यांनी हातात घेवून तपासला तेव्हा तो दोन काडतुसांसह सज्ज असल्याचे आढळले. म्हणजेच कारवाई दरम्यान पोलिसांकडून छोटीशीही चूक झाली असती तर अनर्थ घडण्याचीही दाट शक्यता होती. मात्र या प्रकारादरम्यान पोलीस कर्मचारी डोके, सारबंदे यांनीही पुढे सरसावत आरोपीवर झडप घातली आणि क्षणात त्याच्या मुसक्या आवळल्या.

सायंकाळी सहाची वेळ.. चाकरमान्यांची, डेअरीला दूध घालून, शाळा-महाविद्यालय संपवून घरी परतणार्‍यांच्या वर्दळीची वेळ.. समनापूर, वडगाव पान म्हणजे संगमनेरच्या उपनगरांसारखी वाटावी अशी गावे. अशा वर्दळीच्या वेळी काही मिनिटे घडलेला हा थरार ज्यांनी पाहिला, त्यांनी एरव्ही चित्रपटात दाखवले जाणारे मात्र अवास्तव भासणारे चित्र प्रत्यक्ष अनुभवले. नागरिकांमध्ये गोंधळ होवू नये म्हणून पोलिसांनी जलद कायदेशीर पूर्तता करुन आरोपीला तालुका पोलीस ठाण्यात आणले. सुरुवातीला उडवाउडवी करणार्‍या संशयिताला खाक्या दाखवताच त्याने आपले नाव अजीम उर्फ अजू अन्वर पठाण (वय २६, रा.मिल्लतनगर, वॉर्ड नं.१, श्रीरामपूर) असल्याचे व सदरचा कट्टा कल्याणहून खरेदीकरुन विक्रीसाठी श्रीरामपूरला घेवून जात असल्याचे सांगितले.

याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ५, ३, २५, २५ (८) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करुन त्याची कोठडी मागितली जाणार आहे. त्यातून जिल्ह्यातील बेकायदा गावठी कट्टा विक्रीचे ‘रॅकेट’ समोर येण्यासह पकडलेल्या आरोपीने कोणासाठी आणि कोठून हा कट्टा आणला होता? यापूर्वी त्याने कोणाला अशाप्रकारे कट्टे आणून दिले आहेत का? या प्रकरणात आणखी कोणी त्याच्यासोबत आहे का? वडगाव पान फाट्यावर उतरण्याचे औचित्य काय? अशा अनेक प्रश्नांतून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता असून त्यासाठी या संपूर्ण प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास होण्याची गरज आहे.

श्रीरामपूर शहर जिल्ह्यातील गुन्हेगारांचे केंद्र म्हणून वारंवार समोर आले आहे. या शहरात राहणारे अनेक गुन्हेगार जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालून तेथे आश्रयास आहेस. संगमनेर शहरात आजवर घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या ८० टक्के प्रकरणात श्रीरामपूरच्याच चोरट्यांचा हात असल्याचेही सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील लव्ह जिहादच्या घटना असो की अत्याचाराच्या त्यातही या शहरातील गुन्हेगारांचीच आघाडी दिसते. इतके सगळे स्पष्टपणे दिसत असतानाही पोलिसांकडून त्याच्या उच्चाटनात होणारे दुर्लक्ष संशयास्पद आहे. संगमनेरात गावठी कट्ट्यासह पकलेल्या अजीम पठाणवर श्रीरामपूरात आठपेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *