‘आरपीएल’ क्रिकेट स्पर्धेची संगमनेरात शानदार सुरुवात राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारे आयोजित राजस्थान प्रीमियर लीग (आरपीएल) क्रिकेट स्पर्धेला सोमवारी (ता.22) सायंकाळी मालपाणी लॉन्सवर शानदार सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांच्या हस्ते झाले.

23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविली जाणार असून अ गटातील 4 व ब गटातील 4 असे एकूण 8 संघ यामध्ये सहभागी झाले आहेत. भरगच्च रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफीज हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण आहे. विजेत्या संघाला शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने 25 हजार रुपये रोख, विजेतेपदाची ट्रॉफी व उपविजेत्या संघास महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने 15 हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. पीयूष भंडारी यांच्यावतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी 3 हजार 500 रुपये रोख व ट्रॉफी, ऑरेंज कॅप विजेत्यास तिरुपती ऑटोमोबाईल्सचे रोहित मणियार यांच्यावतीने 2 हजार 500 रुपये व ट्रॉफी, पर्पल कॅप विजेत्यास न्यू चक्रपाणी ऑटोमोबाईल्सचे सचिन पलोड यांच्यावतीने 2 हजार 500 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.

याशिवाय सलग चार चौकार, सलग तीन षटकार, सलग, तीन बळी, जलद अर्धशतक, अप्रतिम झेल यांना एस. व्ही. आसावा आणि कंपनी यांच्यावतीने 1100 रुपयांचे पारितोषिक तर मॅन ऑफ द मॅचसाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्यावतीने ट्रॉफी दिली जाणार आहे. कोरोनाविषयी शासनाने घातलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून ही स्पर्धा होत आहे.

उद्घाटनावेळी राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष कैलास राठी, उपाध्यक्ष रोहित मणियार, सचिव महेश झंवर, कोषाध्यक्ष कल्याण कासट, सहसचिव निशांत जाजू, सहकोषाध्यक्ष दर्शन नावंदर, रामेश्वर भंडारी, राजेंद्र होंडाचे कैलास सोमाणी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित, गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे बाळासाहेब देशमाने आदी उपस्थित होते. उद्घाटक राजेश मालपाणी यांनी श्रीफळ वाढवून व रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. सोमवारी एकूण चार सामने झाले. मालपाणी यांच्या हस्ते शुभारंभाच्या सामन्याची नाणेफेक करण्यात आली. ती जिंकून माहेश्वरी सुपर स्ट्रायकर्स या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माहेश्वरी नाईट रायडर्सचा सहजपणे पराभव करून हा सामना खिशात घातला. माहेश्वरी किंग्ज व माहेश्वरी डेअर डेव्हिल्स या दुसर्‍या सामन्यात माहेश्वरी किंग्ज विजयी झाला. तिसर्‍या सामन्यात माहेश्वरी सुपर किंग्जने माहेश्वरी थंडर्स यांचा पराभव केला. चौथ्या सामन्यात माहेश्वरी इंडियन्सवर माहेश्वरी वॉरियर्सने मात करून आगेकूच केली.

या स्पर्धेत 26 फेब्रुवारीपर्यंत दररोज पाच ते रात्री साडेनऊ यावेळेत चार सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी होईल. स्पर्धा यशस्वीतेसाठी जय मालपाणी, अक्षय कलंत्री, प्रतीक पोफळे, प्रतीक मणियार, संदीप लोहे, शुभम लोहे, व्यंकटेश लाहोटी, आशिष राठी, गणेश पडतानी, आनंद लाहोटी, प्रेम मणियार, कालिदास कलंत्री यांचा समावेश असलेली प्रकल्प समिती कार्यरत आहे. स्पर्धेसाठी मैदान मालपाणी उद्योग समूहाच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आले आहे. राजेंद्र होंडाचे संचालक सीए कैलास सोमाणी यांच्यावतीने संपूर्ण स्पर्धेसाठी अकरा हजार रुपयांचे चेंडू देण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी थर्ड अम्पायरची भूमिका बजावणारे 4 कॅमेरे ओंकार इंदाणी यांच्यावतीने देण्यात आले आहेत.

Visits: 8 Today: 1 Total: 115854

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *