भारताला विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगामध्ये ः डॉ. मालपाणी तिसर्या राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेला संगमनेरमध्ये शानदार सुरुवात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
योगसाधना ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. अखिल मानव जातीला भारतामुळे लाभलेले हे वरदान आहे. भारताला विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगामध्ये दडलेले आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सुसज्ज क्रीडा नगरीत तिसर्या राष्ट्रीय सबज्युनिअर आणि ज्युनिअर योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार शुभारंभ सोहळा आज पार पडला. याप्रसंगी डॉ. मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक व खेलो इंडियाचे निरीक्षक शब्बीर शिकलकर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक, स्पर्धा व्यवस्थापक निरंजन मूर्ती, सतीश मोहगावकर, विश्व योगासन प्रतिनिधी अॅड. उमेश नारंग, डॉ. सी. व्ही. जयंती, पुखरंबम वीरप्रदास, श्याम लता आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या अर्चना घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. मालपाणी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाची संधी आम्हाला देऊन आमच्यावर खूप मोठा विश्वास राष्ट्रीय योगासन फेडरेशनने टाकला आहे. 29 राज्यांमधील 789 हून अधिक योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक खेळाडूला प्रत्यक्ष सुवर्णपदक मिळू शकत नाही. मात्र इथे त्यांना प्रचंड उपयुक्त ठरणारा अनुभव मिळेल. येथून प्रत्येक योगासनपटू अनुभवाचे, शिक्षणाचे, नाविन्याचे आणि निश्चयाचे सुवर्णपदक मात्र नक्कीच घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. येथून मिळणारे अनुभवाचे सुवर्णपदक त्यांच्या जीवनाचे सोने करणारे असेल. मन, मेंदू आणि मनगट यांचा उत्कृष्ट समन्वय साधण्याचे कार्य योगासनांच्या माध्यमातून होते. म्हणूनच योगाला यशदाता म्हटले जाते. जागतिक योगासन संघटनेचे अध्यक्ष योगर्षी स्वामी रामदेव महाराज व डॉ. एच. आर. नागेंद्र गुरुजी यांचे आशीर्वाद घेऊन उदित शेठ व डॉ. जयदीप आर्य यांच्या मार्गदर्शनात योगासन क्रीडा प्रकार जागतिक क्षितिजावर नेण्यासाठी सर्वांच्या साथीने आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात 29 राज्यांमधून आलेल्या सर्व खेळाडूंच्या पथकांचे मैदानावर शानदार ध्वज संचलन झाले. डॉ. मालपाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण होताच योगासन गीताचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्रुवच्या नृत्य पथकाने वंदे मातरमच्या तालावर नृत्य सादर केले. तृप्ती डोंगरे या मागील वर्षीच्या सर्वोत्कृष्ट योगासनपटूने स्पर्धेची ज्योत मशालीद्वारे प्रज्वलित केली. महाराष्ट्र संघाचा कर्णधार रुपेश सांगे याने सर्व खेळाडूंना शपथ दिली. बापू पाडळकर यांनी आपल्या भाषणामध्ये अत्यंत भव्य-दिव्य आणि नीटनेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. ‘खेलो इंडिया’चे निरीक्षक आणि उद्घाटक शब्बीर शिकलकर यांनी स्पर्धा सुरु झाल्याची अधिकृत घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदीमध्ये शीला बन्सल यांनी तर इंग्रजीमध्ये अंजली जाधव यांनी केले. महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनचे राजेश पवार यांनी आभार मानले.

स्पर्धेच्या तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक यांनी आपला आवाज बसलेला असल्याने देहबोलीतून भाषण सादर केले, त्याला सर्व स्पर्धकांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्तपणे दाद दिली. सकाळी 7 वाजता डॉ. संजय मालपाणी यांनी सर्व खेळाडूंचे ध्यानसत्र घेतले. खेळाच्या माध्यमातून जीवन योगमय करण्याचा हा आगळावेगळा पायंडा या स्पर्धेच्या माध्यमातून घातला गेला.
