संगमनेर पालिकेचा दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत राबविला जाणार उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘हरित संगमनेर, स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर’ या संकल्पनेंतर्गत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून व महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत संगमनेर शहरातील विविध मोकळ्या जागांवर तब्बल दहा हजार डेरेदार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्ताने गुरुवारी (ता.25) मालदाड रस्ता परिसरात या अभियानांतर्गत विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, चिंच, बकुळा, फळझाडे व फुलझाडांचा समावेश आहे.

या अभियान प्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विश्वास मुर्तडक, बाळासाहेब पवार, सुनंदा दिघे, सोनाली शिंदे, किशोर टोकसे, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सुहास आहेर, धनंजय डाके, बाबा खरात, सोमनाथ सातपुते, संतोष सातपुते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील सर्व नगरपरिषदांमधून ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जल, अग्नि, वायू यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वृक्षारोपण व स्वच्छता अशा उपक्रमांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत मालदाड रस्ता, घोडेकर मळा, देवाचा मळा, वेताळ बाबा मंदिर, सातपुते मळा अशा परिसरातील मोकळ्या जागांमध्ये डेरेदार व घनदाट सावली असलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. साधारण दहा हजार वृक्षांचे रोपण या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे.

ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर वृक्षारोपण व संगोपन हा एकमात्र उपाय आहे. वाढते प्रदूषण, वाढते आजार, कोरोनाचा प्रादुर्भाव हे सर्व पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळे घडत आहे. म्हणून प्रत्येकाने वृक्षरोपण व संगोपन करावे.
– दुर्गा तांबे (नगराध्यक्षा)
![]()
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका सक्षमपणे कार्यरत आहे. विविध वृक्षांचे रोपण व संगोपन केले जात आहे. मात्र यामध्ये नागरिकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. कोणतेही वृक्ष तोडू नका उलट वृक्षांचे जतन करा.
– डॉ.सचिन बांगर (मुख्याधिकारी)
