तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींसाठी माध्यान्नापर्यंत 34 टक्के मतदान! कर्तव्यावरील अठराशे कर्मचार्‍यांना निवडणुक अधिकार्‍यांनी वाटले तिळगुळ!


नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकशाहीत ‘गावची विधानसभा’ असणार्‍या ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठीच्या मतदानास आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यातील एकूण 94 ग्रामपंचायतींसाठी निवड प्रक्रीया सुरु झाली होती, त्यातील चार ठिकाणी बिनविरोधचे झेंडे फडकल्याने आज प्रत्यक्षात नव्वद ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. सकाळपासूनच ठिकठिकाणच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दृष्य दिसत असून मतदान प्रक्रीया सुरु झाल्यापासून माध्यान्नापर्यंत 33.74 टक्के मतदान झाल्याने मतदारांमध्ये उत्साह पहाण्यास मिळत आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी कर्तव्यावरील अठराशे कर्मचार्‍यांना तिळगुळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व निवडणुकीची प्रक्रीया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले.


गावकीच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींच्या सदस्य निवडीसाठी आज मतदान प्रक्रीया राबविली जात आहे. संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींमध्येही निवडणुका होत आहेत. मात्र यातील आंबी खालसा, भोजदरी, निमगाव टेंभी व निमगाव बु. येथील ग्रावकर्‍यांनी राजकारणापेक्षा गावाच्या विकासाला अधिक महत्त्व देत निवडणुक टाळण्याचा आदर्श निर्णय घेतल्याने आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिनी 90 ग्रामपंचायतीमधील 287 प्रभागातील सदस्य निवडीसाठी मतदान सुरु झाले आहे. या निवडणुकीत एकूण 696 जागांसाठी 1 हजार 482 उमेदवार आपले राजकीय नशिब आजमावत आहेत.


प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील 297 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक मदतनीस व सुरक्षा रक्षक अशा टीम बनविण्यात आल्या आहेत. त्यासोबतच 33 राखीव पथकेही तयार करण्यात आली असून या संपूर्ण प्रक्रीयेसाठी 1 हजार 800 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ति करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रात कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांसाठी मास्कशिल्ड (मुख आवरण), मास्क, हातमोजे व सॅनिटायझरची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपल्या पूर्ण क्षमतेसह निवडणुक प्रक्रीया पार पडेपर्यंत सज्जता राखण्यास सांगण्यात आले असून तहसीलदारांनी तसे लेखी आदेशही बजावले आहेत.


निवडणुका होत असलेल्या गावांमध्ये गुरुवारी (ता.14) सायंकाळी 52 शालेय बस, तेरा शासकीय व 37 खासगी वाहनांद्वारे मतदान अधिकारी, कर्मचारी व मतदान साहित्य वाहुन नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वाहनात बसण्यापूर्वी प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुक निर्णण अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी तिळगुळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. मकरसंक्रमणाचा योग साधून कर्मचार्‍यांना तिळगुळाचे वाटप करण्याचा बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा. आज सकाळी मतदान प्रक्रीया सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत मतदारांचा उत्साह देखील दिसून आला, अशीच स्थिती दिवसभर दिसण्याचा अंदाज असून यंदा मतदानाचा टक्का वाढण्याचाही अंदाज वर्तविला जात आहे.


संगमनेर तालुक्यातील एकूण 94 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीच्या घोषणा झाली होती. मात्र त्यातील आंबी खालसा, भोजदरी, निमगाव टेंभी व निमगाव बु. येथील ग्रामस्थांनी गावकीच्या विकासाला प्राधान्या देत आपल्या गावातील निवडणुका बिनविरोध केल्या. त्यामुळे आज (ता.15) सकाळी साडेसात वाजेपासून तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीमधील 287 प्रभागातील 696 सदस्य संख्येसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी 1 हजार 482 उमेदवार आपले नशिब आजमावून बघत आहेत. या निवडणुकीत एकूण 1 लाख 67 हजार 911 मतदार असून त्यात 88 हजार 461 पुरुष, 79 हजार 449 महिला तर एका अन्य मतदाराचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 297 निवडणुक केंद्र कार्यान्वीत असून त्यासाठी 1 हजार 792 कर्मचार्‍यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

माध्यान्नापर्यंत 34 टक्के मतदान..
तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या 696 सदस्यांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सकाळी साडेसात ते साडे अकरा या कालावधीत 1 लाख 67 हजार 911 मतदारांपैकी 56 हजार 650 मतदारांनी (33.74 टक्के) आपला हक्क बजावला आहे. यात 22 हजार 617 पुरुष तर 34 हजार 33 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा असल्याने यंदा तालुक्यातील मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून गावागावात परिवर्तनाचे पाट वाहतील असेच काहीसे चित्र दिसत आहे.

देवगाव आरोग्य केंद्र बंदच!
कोविडच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आपत्कालीन परिस्थितीसाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे आदेश निवडणुक अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी बजावले होते. मात्र देवगावच्या आरोग्य अधिकार्‍यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आज सकाळी 10 वाजता पहायला मिळाले. त्यामुळे निवडणुकीच्या उत्साहातही येथील मतदार कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करीत होते.

Visits: 183 Today: 2 Total: 1112946

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *