अकोलेकरांनो, थोडा धीर धरा! तब्बल सहा पथकांकडून तपास सुरु आहे!! संकेत नवले खून प्रकरण; कोणताही पुरावा हाती नसतांनाही पोलिसांची अहोरात्र धडपड..


श्याम तिवारी, संगमनेर
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेणार्‍या मूळ अकोल्याच्या संकेत सुरेश नवले या बावीस वर्षीय विद्यार्थ्याचा खून होवून आज एकोणावीसावा दिवस उजाडला. या कालावधीत त्याच्या मारेकर्‍याचा तपास लावण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यापासून ते अगदी खासगी सायबर तज्ज्ञांपर्यंत वेगवेगळ्या सहा कड्यांच्या माध्यमातून पोलिसांनी सगळ्या शक्यताही पडताळून बघितल्या. या प्रकरणाच्या तपासातून समोर येणार्‍या तथ्यांची पडताळणी करतांना पोलिसांनी आत्तापर्यंत आठजणांना ताब्यात घेवून त्यांचीही सखोल चौकशी केली. या घटनेपासूनच सदरील विद्यार्थ्याचा मोबाईलही गायब आहे, मात्र त्यावर अडकून न बसता पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यातील बहुतेक ‘डाटा’ही मिळवला. त्याच्या विश्लेषणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र अजूनपर्यंत पोलिसांना या खुनामागील ‘उद्देश’ शोधता आलेला नाही. परंतु, मागील 24 तासांत घडलेल्या काही घडामोडी पोलिसांना सुताचा मार्ग दाखवतील अशी शक्यता निर्माण झाली असून तोपर्यंत अकोलेकरांनी धीर धरण्याची गरज आहे.

गेल्या 8 डिसेंबर रोजी रात्रीच्यावेळी संकेत सुरेश नवले या अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्याचा निर्घृणपणे खून झाल्याचा प्रकार दुसर्‍या दिवशी 9 डिसेंबर रोजी समोर आला होता. या घटनेत मयत झालेला तरुण अकोल्यातील नवलेवाडीच्या जिल्हा परिषद शिक्षण सुरेश बाबुराव नवले यांचा एकुलता एक मुलगा असल्याचे समोर आल्यानंतर संगमनेरसह संपूर्ण अकोले तालुक्यातही खळबळ उडाली होती. या प्रकरणात मयताच्या उत्तरीय तपासणीनंतर त्याच्या डोक्यात टणकदार वस्तूचा प्रहार करुन खून झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकार्‍यांनी नोंदविल्यानंतर शनिवारी (10 डिसेंबर) मयत विद्यार्थ्याचा आतेभाऊ तेजस गुंजाळ (रा. धांदरफळ बु.) याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली.

अमृतवाहिनी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणार्‍या संकेतने आपल्या सुविधेसाठी गेल्या जूनमध्ये महाविद्यालयाच्या समोरील बाजूस एका खासगी व्यक्तीच्या खोल्यांमधील एक खोली भाड्याने घेतली होती व तो आपल्या अन्य दोन विद्यार्थी मित्रांसह तेथेच वास्तव्यास होता. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाविद्यालयातील विविध वर्गाला उपस्थित राहणारा संकेत सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत त्याच ठिकाणी शिकवणीसाठी जात व सायंकाळी तो याच परिसरातील एका खासगी अभ्यासिकेतही अभ्यासासाठी जात होता. त्याला दररोज दुपारी धांदरफळमध्ये राहणारा त्याचा आतेभाऊ जेवणाचा डबा आणून देत असत. मात्र गेल्या 22 नोव्हेंबरपासून महाविद्यालय बंद असल्याने संकेतचा बहुतेक वेळ आपल्या खोलीत अथवा अभ्यासिकेतच जात होता.

घटनेच्या दिवशी तो संगमनेर शहरात आला होता. तत्पूर्वी अभ्यासिकेतून बाहेर पडताना त्याने पायात पायमोज्यांसह बुट घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. येथून निघताना त्याने अभ्यासिकेच्या व्यवस्थापकांशी केलेल्या चर्चेतून त्याला माघारी येण्यास उशीर होणार असल्याची त्याला पूर्वकल्पना असल्याचेही स्पष्ट झाले आहे. रात्री साडेआठ वाजता येवले चहाच्या दुकानापासून तो स्वतःच घटनास्थळाकडील रस्त्याने गेला, या दरम्यान त्याला कोणी भेटलेही नाही अथवा त्यानेही कोणाशी कोणत्याही माध्यमातून संभाषण केले नाही. त्यामुळे त्याला घटनास्थळी जायचेच होते हे स्पष्ट झाले असले तरीही कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मात्र तपास यंत्रणेला अजून सापडलेले नाही.

9 डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास त्याचा मृतदेह पाहण्यात आल्यानंतर हा विषय समोर आला आणि पोलिसांच्या तपासात त्याच्या मोबाईलसह त्याने घातलेले पायातील मोजेही गायब असल्याचे दिसून आले. मोबाईलप्रमाणेच पायातील मोजे त्यानेच कोठे काढले होते की तपासाची दिशा भरकटवण्यासाठी मारेकर्‍याने तसा प्रकार केला याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. खुनानंतर मारेकर्‍यांनी त्याचा मोबाईल चोरुन नेला, त्यामुळे सुरुवातीला पोलीस अंधारात चाचपडल्यासारखे या प्रकरणाचा तपास करीत होते. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे सोपवित त्यांच्या दिमतीला सायबर सेलची टीम, स्थानिक गुन्हे शाखा, संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांसह त्यांचे पथक, शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले आणि त्यांचे पथक यासह अकोल्याचे सहायक निरीक्षक मिथून घुगे यांच्याकडूनही प्रत्येक शक्यतेची चाचपणी सुरु आहे.

या प्रकरणात मोबाईल ‘गायब’ असला तरीही सायबर सेलच्या तज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत त्याच्या मोबाईलमधील बहुतांशी ‘डाटा’ हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या हाती आलेली ही संपूर्ण माहिती अतिशय गुंतागुंतीची असून त्याचे विश्लेषण करण्यासाठी पोलिसांची एक स्वतंत्र टीम काम करीत आहे. याशिवाय आत्तापर्यंत मयत विद्यार्थ्याच्या संपर्कात असलेल्यांसह एकूण आठजणांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशीही केली आहे. मात्र त्यातूनही फारसे काही हाती लागलेले नाही. या दरम्यान मयत संकेत सुकेवाडी रस्त्याकडे ज्या मार्गाने गेला होता, बरोबर त्याच मार्गावर त्याचवेळी ‘घिरट्या’ घालणार्‍या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तब्बल बारातास त्याचीही सखोल चौकशी केली, मात्र ती देखील निष्फळ ठरली आहे.

ज्यावेळी संकेतचा खून झाला, त्यावेळी त्याच्याकडे मोबाईल वगळता अन्य कोणताही विशेष ऐवज नव्हता. त्यामुळे त्याचा खून लुटण्याच्या हेतूनेच झाला का? याबाबतही पोलीस साशंक आहेत. महाविद्यालय बंद असल्याने या कालावधीत त्याच्याशी संवाद साधणार्‍यांचीही चौकशी पूर्ण झाली आहे, त्यातूनही हाती काहीही लागलेले नाही. गेल्या एकोणावीस दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी त्याचे मित्र, कुटुंब, आसपासच्या व्यक्ती, महाविद्यालय अथवा अभ्यासिकेतील अन्य विद्यार्थी यांच्याशी वादाची कोणती पार्श्वभूमी आहे का? याबाबतच्या शक्यताही पडताळल्या आहेत. शिवाय प्रेम प्रकरणातून तर हे घडले नाही? याबाबतही एका पथकाकडून तपास सुरु आहे.

मयत संकेत नवले हा संगणक शाखेचा विद्यार्थी होता व तो संगणक आणि मोबाईल या दोन्हीमध्ये अतिशय निष्णात होता. त्यामुळे त्याने बर्‍याच गोष्टी लपवून ठेवल्याचाही पोलिसांचा संशय असून त्यासाठी आता खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली गेली आहे. त्यातून तपासाला दिशाही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या खुनाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व त्यांची टीम, सायबर सेलचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि त्यांचे पथक, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम आणि अकोल्याचे सहायक निरीक्षक मिथून घुगे आणि त्यांच्या पथकाकडूनही वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेण्याची धडपड सुरु असून कोणताही पुरावा नसलेले हे प्रकरण उघड होण्याची पुसटशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अकोलेकरांनो, थोडासा धीर धरा! लवकरच काहीतरी दिलासादायक माहिती समोर येईल.


8 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेत एका तरुण आणि अतिशय हुशार असलेल्या विद्यार्थ्याचा बळी गेला. मात्र या घटनेला 19 दिवसांचा कालावधी उलटला तरीही त्याच्या मारेकर्‍यांचा कोणताही मागमूस लागत नसल्याने अकोल्यातील नागरिक संतप्त झाले आहेत. मात्र एकंदरीत खून झालेल्या विद्यार्थ्याचा अन्य लोकांशी असलेला अतिशय दुर्मिळ संवाद, खून झालेल्या ठिकाणी त्याचे स्वतःच जाणे, घटनास्थळावर अन्य कोणत्याही पुराव्यांचा अभाव. याशिवाय अन्य काही गोष्टी पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र त्यातून अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या कालावधीनंतर पोलिसांना आव्हान देणारी ही घटना घडली असून पोलिसांकडून त्याची उकल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Visits: 342 Today: 3 Total: 1424254

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *