… तर आपण लोकप्रतिनिधी राहण्यात अर्थ नाही ः लंके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपोषण
नायक वृत्तसेवा, नगर
‘लोकप्रतिनिधी असूनही निर्णय घेऊ शकत नसेल, तर आपण लोकप्रतिनिधी राहण्यात अर्थ नाही. ही आमची लढाई आहे. आता या लढ्यात आमचा शेवट झाला, तरी चालेल, परंतु आता आम्ही थांबणार नाही,’ असा निर्धार पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. अधिकार्यांशी होत असलेली चर्चा रात्री उशिरापर्यंत निष्फळ ठरली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत घेणार्या तीन रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आमदार लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आज दुसरा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार लंके यांनी भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
लंके म्हणाले, आंदोलनाच्या दुसर्या दिवशीही प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रशासनातील कोणीही जबाबदार अधिकारी आंदोलनाकडे आले नाहीत. ज्यांना अधिकार नाही, अशांशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जबाबदार कोणीतरी आले पाहिजे. आम्ही आजही ठाम आहोत, की रस्त्याचे काम प्रत्यक्षरीत्या सुरू झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे, हे मी सांगू शकत नाही. प्रशासनाकडून कोणी आले नाही. डॉक्टरही आमच्या तपासणीसाठी आले नाहीत. उपोषणकर्त्यांमध्ये कुणाचा रक्तदाब वाढला, कुणाला मधुमेहाचा त्रास होतो, याची तपासणी सुद्धा कोणी केली नाही. प्रशासनाच्या मनात आमचे मृतदेह उचलण्याचा विचार आहे की काय? अशी शंका निर्माण होत असल्याचे लंके म्हणाले. या रस्त्यांच्या अपघातात आमच्या माता भगिनी या विधवा झाल्या आहेत, हे विसरून चालणार नाही, असेही आमदार लंके यांनी सांगितले.
सायंकाळी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी उपोषणस्थळी आले. त्यांनी लंके यांच्यासह शिवशंकर राजळे, क्षितीज घुले, सतीश पालवे, हरिहर गर्जे, रफीक शेख, किसन अव्हाड, बंडू बोरुडे, गहिनीनाथ शिरसाट, चाँद मणियार, ताहेर पटेल या उपोषणकर्त्यांशी झालेल्या कामाची, अर्धवट कामांची, पुलांची व कामाच्या सद्यस्थातीची चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने आमदार लंके यांनी हे उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.