पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांचे साकडे! बैठकीतूनच रेल्वेमंत्र्यांशी संवाद; केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्याचा शब्द..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नगर व नाशिक जिल्ह्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरणार्या ‘पुणे-नाशिक’ या बहुप्रतिक्षीत रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरु व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधला. या जलद रेल्वेमार्गामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्याला अंतिम मंजुरी द्यावी अशी विनंती त्यांनी रेल्वेमंत्र्यांना केली. त्यावर या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असा ‘शब्द’ त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. यापूर्वी आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळताच या रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी ‘महारेल’च्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीसाठी खोळंबलेल्या ‘पुणे-नाशिक’ या देशातील पहिल्या सेमी-हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत मंगळवारी (ता.13) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, श्रीरंग बारणे यांच्यासह महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (महारेल) व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, मुख्य सल्लागार सत्यप्रकाश, मुख्यमंत्री सचिवालयाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉररुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे-नाशिक हा सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्प 235 किलोमीटर लांबीचा असून त्याचा लाभ पुण्यासह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. देशातील अतिशय किफायतशीर रेल्वेमार्ग म्हणूनही या प्रकल्पाकडे पाहीले जाते. एकूण 16 हजार 39 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला केंद्रीय नीति आयोगाकडून यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. या प्रकल्पासाठी राज्य व केंद्राचा प्रत्येकी 20 टक्के हिस्सा असून उर्वरीत 60 टक्के रक्कम खासगी गुंतवणुकीतून उभी केली जाणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच आपल्या वाट्याच्या 3 हजार 273 कोटी रुपयांच्या निधीला तत्वतः मान्यता दिलेली असून प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत.
या रेल्वेमार्गासंदर्भात मंगळवारी (ता.13) महारेलच्या अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाचे सादरीकरण दाखवले. उत्तर भारतला दक्षिण भारताशी जोडणारा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प केवळ पुणे-नगर-नाशिक या तीन जिल्ह्यांसाठीच नव्हेतर संपूर्ण राज्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादरीकरण पाहिल्यानंतर व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी लागलीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बैठकीतूनच दूरध्वनीवर संपर्क साधला. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना या मार्गाचे महत्त्व पटवून देताना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करुन लवकर मंजुरी देण्याची विनंती त्यांना केली. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असा ‘शब्द’ त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला. त्यावर मंजुरी मिळताच विनाविलंब प्रकल्पाचे काम सुरू करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकार्यांना दिल्या आहेत.
पुणे-नाशिक या दोन महानगरांच्या दरम्यानचा हा रेल्वेमार्ग अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. सध्या पुणे ते नाशिक हे अंतर कापण्यासाठी वाहन मार्गाने सहा ते आठ तासांचा कालावधी लागतो. मात्र हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यानंतर या दोन्ही महानगरांदरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होवून तो अवघ्या दोन तासांवर येईल. याशिवाय नाशिक व पुणे येथील औद्योगिक वसाहतींनाही या मार्गाशी जोडले जाणार असून संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांना आपला शेतीमाल महानगरांमध्ये पोहोचवणे अधिक सोयीचे होणार असल्याने हा रेल्वेमार्ग विकासाच्या मार्गावरील मैलाचा दगड ठरेल.