राज्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णवाढीचा वेग सर्वाधिक! राज्यात जिल्ह्याची तर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याची कोविड स्थिती चिंताजनक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील कोविड संक्रमणाचा वेग आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसू लागल्याने संभाव्य तिसर्या लाटेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र यासर्व घडामोडींना अहमदनगर जिल्हा मात्र अपवाद ठरला असून जिल्ह्याची कोविड स्थिती आजही चिंताजनक असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यातील सर्वाधिक गतीने रुग्णसमोर येणार्या जिल्ह्यात अहमदनगर अव्वलस्थानी असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने जिल्ह्याची अवस्था बिकट बनली आहे. राज्यात मागील सात दिवसांत समोर आलेल्या एकूण रुग्णांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 20 टक्के रुग्णांचा समावेश असून जिल्ह्यातील रुग्ण आढळण्याचा सरासरी वेगही राज्यात सर्वाधिक 4.78 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यातील तिसर्या संक्रमणाचा उगम अहमदनगर जिल्ह्यातूनच होणार असल्याचे विभागीय आयुक्तांचे मत तंतोतंत खरे ठरण्याची भीतीही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होवू लागली आहे.
सक्रीय रुग्णांच्या बाबतीत राज्यात तिसर्यास्थानी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट अजूनही नियंत्रणात आलेली नाही. त्यातच नागरिक आणि प्रशासन या दोहींकडून कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणीच होत नसल्याने जिल्ह्यात आणि त्यातही संगमनेर, पारनेर, अकोले, श्रीगोंदा, पाथर्डी व राहाता या सहा तालुक्यात कोविडचा मुक्त संचार सुरुच आहे. राज्यात सर्वाधीक रुग्णवाढीचा दर असलेल्या जिल्ह्यातही अहमदनगर अग्रस्थानी असून राज्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यातून दररोज 0.202 टक्के दराने रुग्णवाढ होत आहे. राज्याचा एकूण सरासरी रुग्णवाढीचा दर मात्र 0.052 टक्के इतकाच आहे.
नवीन रुग्ण समोर येणार्या जिल्ह्यांमध्येही पुण्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत पुणे व ठाणे या महानगरांसोबतच अहमदनगरचाही समावेश असून स्त्राव चाचण्यातून रुग्णसमोर येण्याचा (पॉझिटिव्हीटी) जिल्ह्याचा दरही राज्यात सर्वाधिक 4.78 टक्के इतका आहे. धुळे हा राज्यात सर्वात कमी (0.08 टक्के) पॉझिटिव्हीटी असलेला जिल्हा ठरला असून राज्याचा एकूण सरासरी वेगही 2.28 टक्के इतका आहे. म्युकरमायकोसीस बाधित रुग्ण आढळणार्या जिल्ह्यांमध्ये मात्र अहमदनगर जिल्हा दहाव्यास्थानी असून आजवर जिल्ह्यात एकूण तीनशे रुग्ण आढळले असून 263 रुग्णांवर उपचार पूर्ण करण्यात आले आहेत तर 13 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील चोवीस जणांचा म्युकरमायकोसिसने बळीही घेतला आहे. मागील महिन्याभराचा विचार करता जिल्ह्यातील रुग्णसमोर येण्याच्या सरासरीमध्ये काही प्रमाणात घट नोंदविली गेली आहे. 25 ते 31 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटीचा वेग 4.85 टक्के होता. 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत तो 5.35 टक्क्यांवर, 8 ते 14 सप्टेंबर या कालावधीत 5.52 टक्क्यांवर तर 15 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मात्र 4.78 टक्क्यांवर आला आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आजवर सापडलेल्या एकूण रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रात सर्वाधीक 57 हजार 544 जणांना कोविडची लागण झाली, 55 हजार 867 जणांवर उपचार करण्यात आले, 1 हजार 526 जणांचा मृत्यू झाला तर 151 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात दुसर्या क्रमांकावर संगमनेर तालुक्यातून 34 हजार 274 रुग्ण आढळले असून त्यातील 32 हजार 871 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 438 नागरिकांचा बळी गेला असून सध्या जिल्ह्यातील सर्वाधिक 965 सक्रीय रुग्ण तालुक्यात आहेत. अहमदनगर ग्रामीण क्षेत्रातील 24 हजार 450 जणांना कोविडची बाधा झाली. 23 हजार 483 रुग्णांनी उपचार पूर्ण केले, 664 जणांचे जीवे गेले तर 303 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. राहाता तालुक्यात आजवर 23 हजार 810 रुग्ण आढळले. त्यातील 22 हजार 930 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 462 जणांचा बळी गेला तर 418 जणांवर उपचार सुरु आहेत.
पारनेर तालुक्यातून 22 हजार 846 बाधित समोर आले असून 21 हजार 878 जणांवर उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. 390 जणांचे आजवर बळी गेले असून 578 जणांवर उपचार सुरु आहेत. पाथर्डी तालुक्यातून आत्तापर्यंत 18 हजार 863 रुग्ण आढळले असून 18 हजार 287 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. 282 जणांचा मृत्यू झाला असून 294 जणांवर उपचार सुरु आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील 18 हजार 439 जणांना कोविडचे संक्रमण झाले. 17 हजार 667 जणांनी उपचार पूर्ण केले. 427 जणांचा बळी गेला तर 345 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. अकोले तालुक्यातून 17 हजार 996 रुग्ण आढळले असून 17 हजार 472 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. 165 जणांचा बळी गेला असून 359 रुग्ण सक्रीय आहेत. श्रीरामपूर तालुक्यात 17 हजार 436 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 16 हजार 935 रुग्णांवर उपचार झाले असून 354 जणांचा जीव गेला आहे तर सध्या 147 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शेवगाव तालुक्यातील 17 हजार 323 जणांना कोविडची लागण झाली, 16 हजार 751 जणांनी उपचार घेतले, 260 जणांचा मृत्यू झाला तर 312 जणांवर उपचार सुरु आहेत. राहुरी तालुक्यातील 17 हजार 39 जणांना बाधा झाली, 16 हजार 422 जणांनी उपचार पूर्ण केले. 409 जणांचे बळी गेले तर 208 जणांवर उपचार सुरु आहेत. नेवासा तालुक्यात 16 हजार 815 रुग्ण सापडले. 16 हजार 264 जणांवर उपचार पूर्ण करण्यात आले. 338 जणांचा बळी गेला तर 213 जणांवर उपचार सुरु आहेत. कर्जत तालुक्यात 16 हजार 190 रुग्ण आढळले, 15 हजार 713 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 248 जणांचा जीव गेला तर 229 जणांवर उपचार सुरु आहेत. कोपरगाव तालुक्यातील 15 हजार 728 जणांना लागण झाली, 15 हजार 340 जणांवर उपचारही करण्यात आले. 214 जणांचा जरीव गेला व 174 रुग्ण सध्या सक्रीय आहेत. तर जामखेडमध्ये 11 हजार 633 रुग्ण आढळले. 11 हजार 238 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 282 जणांचा बळी गेला तर 113 जणांवर उपचार सुरु आहेत. भिंगारचा लष्करी परिसर, लष्करी रुग्णालय, इतर जिल्हे व इतर राज्य मिळून आजवर जिल्ह्यात 3 लाख 40 हजार 247 रुग्ण आढळले, 3 लाख 28 हजार 581 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 6 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला तर सध्या 4 हजार 900 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.