माळवाडगावमध्ये दोन तरुणांमध्ये तुफान राडा एक मोटारसायकल जाळली; तालुका पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
दोन तरुणांचा पूर्वीचा वाद पुन्हा उफाळून आल्याने परस्परांच्या मोटारसायकलच्या तोडफोडीनंतर एकाची मोटारसायकल पेटवून दिल्याची घटना माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वसाससमोर घडली आहे.

काही महिन्यांपूर्वी घटना घडलेल्या ठिकाणीच प्राथमिक शाळेसमोर एका तरुणाने दुसर्‍या तरुणावर चाकू हल्ला केला होता. पोलिसांत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी जखमी तरुणाला रुग्णालयात तर आरोपीला ताब्यात घेतले होते. चाकूचे वार करणार्‍या आरोपीस जामीन झाल्यानंतर गावात एकमेकांत संघर्ष वाढतच होता. पूर्वीच्या वादामुळे अधूनमधून त्यांच्यात खटके उडत. आज मात्र भडका उडाला. पूर्वी ज्या तरुणाने वार केले होते. त्यास मारहाण करून त्याची मोटारसायकल फोडण्यात आली. त्यानंतर शहरी गुंडगिरीप्रमाणे गावात पळापळ व दहशतीचा राडा सुरू झाला.

याचवेळी गावात दत्तजयंती मिरवणूक सुरू असल्याने हा प्रकार लवकर लक्षात आला नाही. ज्या तरुणावर हल्ला झाला त्याने स्वत: ही खबर पोलिसांना दिल्याने पोलीस तातडीने गावात दाखल झाले. त्यांनी खबर देणार्‍या जखमी तरुणास उचलून उपचारासाठी रुग्णालयात नेले. पोलीस निघून गेल्यानंतर दुसर्‍या तरुणाने दहशतीच्या वातावरणात आपल्या सहकार्‍यांसह येऊन मोटारसायकल पेटवून दिली. हा सर्व प्रकार गावकरी उघड्या डोळ्याने पाहात होते. या राड्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गणेश दत्तात्रय पठारे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सुजीत आसने, सुशील वाकेकर, तेजस मोरे या तरुणांविरूद्ध गुरनं. 523/2022 भादंवि. कलम 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून दुसर्‍या दिवशी पोलिसांनी जळालेल्या मोटारसायकलचा पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल नवनाथ बर्डे हे करीत आहेत.

Visits: 17 Today: 1 Total: 118731

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *