मनोरुग्न तरुणीवर नराधमाचा बलात्कार! संगमनेरात धक्कादायक कृत्यांची श्रृंखला; भावासह नागरीकांनी आरोपीला पकडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरालगतच्या अवघ्या सतरा वर्षीय मुलीला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या घटनेने शहरात संताप निर्माण झालेला असताना त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. या घटनेत घरात एकट्याच असलेल्या 45 वर्षीय मानसिक रुग्ण तरुणीवर तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत मूळच्या उत्तर प्रदेशातील एकाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पीडितेची आई घरी परतल्यानंतर उघड झालेल्या या घटनेतील आरोपीला पीडितेच्या भावासह परिसरातील काहींनी रंगहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपी प्रकाश रामनरेश निषाद याला गजाआड केले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.11) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास शहरालगतच्या इंदिरानगरमधील एका वसाहतीत घडला. या वसाहतीत एक वृद्ध महिला मानसिक रुग्ण असलेल्या आपल्या 45 वर्षीय मुलीसह राहते. तर, याच परिसरातील दुसर्‍या वसाहतीमध्ये त्यांचा मुलगा व सून आपल्या दोन अपत्यांसह राहतात. हे दोघे पती-पत्नी रोजगारासाठी जात असल्याने दररोज दुपारी 12 ते सायंकाळी सहा या वेळेत त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यासाठी पीडितेची आई आपल्या मुलाच्या घरी जाते. या कालावधीत मानसिक रुग्ण असलेली पीडित तरुणी घरात एकटीच असते.


मंगळवारी (ता.11) नेहमीप्रमाणे सदरील वृद्ध महिला आपल्या घरातील कामकाज आटोपून 45 वर्षीय पीडित मुलीला घरीच सोडून आपल्या मुलाच्या घरी गेली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मुलगा कामावरुन घरी आल्याने नेहमीप्रमाणे त्या आपल्या घराकडे गेल्या. त्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांतच ती वृद्ध महिला घाबरलेल्या अवस्थेत धावतपळत पुन्हा आपल्या मुलाच्या घरी आली. यावेळी मुलाने काय झाले आई? असा सवाल करताच त्यांनी ‘तुझी बहिण आवाज देवूनही खोलीचा दरवाजा उघडत नाही, मी मोठ्याने आवाज दिला तरीही प्रतिसाद नाही, मी मुलांजवळ थांबते, तु एकदा जावून बघ काय झालंय ते..’ असे म्हणतं त्यांनी मुलाला आपल्या घरी पाठवले.


सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित तरुणीचा भाऊ आईच्या घरी आला असता दरवाजा बंदच असल्याचे त्याला दिसले. यावेळी त्यानेही आपल्या बहिणीला मोठमोठ्याने आवाज दिला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्याच्या आवाजाने शेजारी राहणारे काही तरुण व महिला मदतीला धावल्या. या प्रकाराने चिडलेल्या पीडितेच्या भावाने रागाने मोठ्यात आवाज देताच खोलीतून पीडितेच्या गाण्याचा आवाज येवू लागला. त्यावेळी तिच्या भावाने खिडकीतून डोकावून पाहिले असता आतील बाजूस एक अनोळखी इसम उभा असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने त्याच्याकडे विचारणा करीत खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले.


खोलीत जाण्यासाठी एकच दरवाजा असल्याने आणि बाहेर माणसं जमा झाल्याने आरोपीने खोलीचा दरवाजा उघडताच पीडितेच्या भावाने ‘कोण आहेस तु? इथे कशाला आलास?’ अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यावर त्याने ‘मी प्लंबर असून, पाईपचे काम करण्यासाठी आलो होतो व माझे नाव सातपुते आहे’ असे तेथे जमलेल्या लोकांना सांगितले. यावेळी काही तरुणांनी आरोपीला पकडून ठेवले तर पीडितेच्या भावाने घरात जावून पाहिले त्यावेळी मानसिक रुग्ण असलेली त्याची बहिण आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे त्याला दिसले. यावेळी शेजारच्या अन्य महिलांनी तिला सावरले.


बाहेर जमलेल्या तरुणांनी पकडलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तो हिंदीतून ‘घरमालकीण मेरी मावसी है, मैं उसको छे सौ रुपये देता हूं, और वो मुझे बुलाती हैं..’ असे काहितरी सांगत स्वतःचे नाव सातपुते असल्याचे सांगू लागला. या सर्व प्रकारांत आपल्या मानसिक रुग्ण असलेल्या बहिणीसोबत याने काहीतरी दूष्कृत्य केल्याचा संशय बळावल्याने पीडितेच्या भावाने शेजारील तरुणांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलिसांनी सरकारी पाहुणचार करताच आरोपीने आपले खरे नाव प्रकाश रामनरेश निषाद असल्याचे व सध्या आपण पावबाकी रोड येथे रहात असून मूळगाव उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर पोलिसांनी पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असता त्यातून तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले.


यावरुन 45 वर्षीय मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीच्या भावाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी प्रकाश रामनरेश निषाद याच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (2) (एल) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करुन त्याला गजाआड केले आहे. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून अधिकच्या तपासासाठी त्याची कोठडी मागीतली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक फडोळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण इंदिरानगर परिसरात एकच खळबळ उडाली असून मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीच्या असहाय्तेचा गैरफायदा घेणार्‍या आरोपीविरोधात संताप व्यक्त होत आहे.


शहरालगतच्या परिसरातील एका 17 वर्षीय मुलीला गळाला लावून परिसरात नव्याने खोली घेणार्‍या एकाने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत वारंवार शारीरिक अत्याचार केले. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी पसार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. सदरच्या घटनेची चर्चा सुरु असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास प्रचंड गजबजलेला परिसर असलेल्या इंदिरानगरमध्ये मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीवरही अत्याचाराची घटना घडल्याने शहरात रोष निर्माण झाला आहे. या घटनेतून महिलांवरील अत्याचाराची श्रृंखला तर सुरु झाली नाही? अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *