भाजपच्या संघटनात्मक बांधणीत डॉ.सुजय विखेंचा ‘राज्याभिषेक’! उत्तर महाराष्ट्रात सत्तेचे नवे समीकरण; महाविकास आघाडीसह मित्र पक्षांनाही आव्हान..


श्याम तिवारी, संगमनेर
महाराष्ट्राच्या राजकारणात विखे-पाटील घराण्याला एक वेगळे वलय आणि वजन आहे. सहकार चळवळीपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास आता जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या, म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक संरचनेत एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. डॉ.सुजय विखे-पाटील यांची भाजपच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ एका माजी खासदाराचे राजकीय ‘पुनर्वसन’ नसून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने खेळलेली एक अत्यंत सावध आणि दूरगामी खेळी आहे. काँग्रेस आणि शिवसेना असा प्रवास करत विखे कुटुंब आता भाजपमध्ये पूर्णपणे स्थिरावले असून, या निवडीमुळे त्यांना पक्षाच्या थेट ‘कोअर’ कमिटीसह धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाले आहे.


खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्राचा भाग गेल्या काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर राहिला आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या या भागात गेल्या काही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने आणि विशेषतः काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठे खिंडार पाडले आहे. अशा स्थितीत या पाच जिल्ह्यांमधील 55 तालुक्यांमध्ये पक्षाची विखुरलेली ताकद एकवटण्यासाठी एका आक्रमक आणि साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या नेतृत्वाची भाजपला गरज होती.


डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या रुपाने भाजपला एक असा चेहरा मिळाला आहे, ज्यांच्याकडे स्वतःची अभेद्य निवडणूक यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचे विस्तीर्ण जाळे आहे. विखे-पाटील घराण्याचा जनसंपर्क केवळ एका जिल्ह्यापूरता मर्यादित नसून, उत्तर महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, शिक्षण संस्था आणि दूध संघांच्या माध्यमातून त्यांचे हितसंबंध सर्वत्र विणलेले आहेत. भाजपला आता या जनसंपर्काचा उपयोग करुन आपले ‘पाय पसरण्यासाठी’ सुपीक जमीन उपलब्ध झाली आहे. विशेषतः नाशिक आणि जळगावमधील अंतर्गत गटबाजी शमवून पक्षाला एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान डॉ.विखे यांच्यासमोर असेल.


उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता एकाच घरातून दोन भिन्न कार्यशैलींचे दर्शन घडणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ओळख एक संयमी, मुत्सद्दी आणि शांतपणे आपली चाल खेळणारे नेते अशी आहे. याउलट, डॉ.सुजय विखे-पाटील यांचा स्वभाव आक्रमक, रोखठोक आणि थेट भिडण्याचा आहे. विखे पिता-पुत्रांची ही ‘सॉफ्ट’ आणि ‘हार्ड’ पॉवरची जुळणी विरोधकांसाठी डोकेदुखी ठरु शकते.


डॉ.सुजय विखे यांची आक्रमकता तरुणांना आकर्षित करणारी आहे, तर राधाकृष्ण विखे यांचा अनुभव जुन्या-जाणत्या नेत्यांना सोबत घेणारा आहे. या दुहेरी शैलीमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतर आता अधिक उत्कंठावर्धक होणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची, खास करुन अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची मर्जी संपादन करण्याची ‘नामी संधी’ या माध्यमातून डॉ.विखे-पाटलांना मिळाली आहे. त्यांनी या पाच जिल्ह्यांमध्ये यशस्वीरीत्या संघटनात्मक बांधणी केली आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या अधिक जागा निवडून आणल्या, तर त्यांच्यासाठी दिल्लीच्या राजकारणाचे दरवाजे पुन्हा एकदा सन्मानाने उघडले जाऊ शकतात. केवळ खासदार म्हणून नव्हे, तर पक्षाचा एक मोठा राष्ट्रीय चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ शकते.


आतापर्यंत विखे-पाटील यांचे राजकारण हे प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्याभोवती केंद्रित होते. मात्र, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदामुळे त्यांना आता पाच जिल्ह्यांचा विस्तृत ‘कॅन्व्हॉस’ मिळाला आहे. विखेंची ‘कसदार निवडणूक यंत्रणा’ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांचे जाळे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणूक लढवण्याचे त्यांचे कौशल्य आता खान्देश आणि नाशिक पट्ट्यात कसे राबवले जाते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे.
(क्रमशः)


या निवडीचा सर्वात मोठा परिणाम स्थानिक आघाड्यांवर होणार आहे. काँग्रेसच्या काळात विखे-पाटील ज्या ताकदीने निवडणुका लढायचे, तीच ताकद आता भाजपच्या विचारधारेला बळ देण्यासाठी वापरली जाणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रस्थापित विरोधी नेत्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ.सुजय विखे-पाटील यांच्यासाठी प्रदेशउपाध्यक्षाची जबाबदारी राजकीय परीक्षा असली तरीही त्यांच्याकडे असलेली संसाधने आणि राजकीय वारसा पाहता, ते उत्तर महाराष्ट्रात भाजपचा ‘नवा सुभेदार’ म्हणून उदयास येण्याची दाट शक्यता आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 1498704

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *