विवाहानंतर दुसर्याच दिवशी नववधूचे दागिन्यांसह पलायन उंबरे येथील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची चर्चा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील उंबरे येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी विवाह करून आलेल्या तरुणीने दुसर्याच दिवशी सुमारे एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची उंबरे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील एका दलालाने तब्बल एक लाख रुपये कमिशन घेऊन उंबरे गावातील एका तरुणाचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका तरुणीशी पाच ते सहा दिवसांपूर्वी लावून दिला होता. नववधूला विवाह सोहळ्यात सुमारे लाखभर रुपयांचे सोन्याचे दागिने वरपक्षाकडून घालण्यात आले होते. हा विवाह हिंदू पद्धतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. विवाह सोहळ्यात वर्हाडी मंडळींना पाची पक्वान्नाचे भोजन देण्यात आले. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर नववधू ही वराच्या घरी म्हणजे उंबरे येथे आली. लग्नाच्या दुसर्या दिवशी नववधू व नवरदेव दोघे उंबरे परिसरातील काही मंदिरात गेले आणि जोडीने देवदर्शन घेतले. देवदर्शन करुन हे नवीन जोडपे पुन्हा घरी परतले. त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास नववधू वराच्या घरातून अचानकपणे अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह बेपत्ता झाल्याचे दिसून आले.
नववधूच्या सासरकडील लोकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर त्यांनी विवाह जुळवून देणार्या मध्यस्थीला फोन करून नववधू बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्या मध्यस्थीने तिचे माहेर असलेल्या वैजापूर येथील तिच्या नातेवाईकांना फोन करून चौकशी केली. त्यावेळी ती नववधू माहेरी सुखरूप पोहचल्याचे समजले. या घटनेतील नवरदेव व त्याच्या घरच्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मध्यस्थी करणार्या दलालाकडे कमिशन दिल्याचे एक लाख रुपये व नवरीला घातलेले दागिने परत करण्याची मागणी केली. जर रक्कम व दागिने दिले नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची उंबरे परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.