सराईत दुचाकी चोरट्याच्या श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या 8 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 12 दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुका पोलिसांनी शुक्रवारी (ता.10) सापळा रचून रांजणगाव (ता.राहाता) सराईत दुचाकी चोरास अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 12 दुचाकी जप्त केल्या आहेत. दत्तू सावळेराव पवार (वय 29, रा.रांजणगाव, ता.राहाता) असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार पोलीस निरीक्षक साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रांजणगाव येथे सापळा रचून दत्तू पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून बजाज कंपनीच्या 3, हिरो होंडा कंपनीच्या 8, टीव्हीएस स्टार कंपनीची 1 अशा एकूण 8 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 12 दुचाकी ताब्यात घेतल्या. त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत (ता.14) पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अढांगळे हे करत आहे.
यापूर्वी दत्तू पवार याच्याविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 12 गाड्यांसह एकूण 18 गुन्हे उघडकीस येणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, सहाय्यक फौजदार ए. बी. अढांगळे, एस. आर. गोरे, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, आबासाहेब गोरे, दादासाहेब लोंढे, दादासाहेब गुंड, साजिद पठाण, चाँद पठाण, प्रशांत रणनवरे, अय्युब शेख, अली हबीब आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.