आदिवासी महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू कातळापूर येथील घटना; किसान सभेकडून महावितरणचा धिक्कार


नायक वृत्तसेवा, अकोले
विजेच्या तारांमधून वाहणार्‍या वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने अकोले तालुक्यातील कातळापूरमधील शेळीपालन करणार्‍या बुधाबाई देवराम गावंडे या महिलेचा बुधवारी (ता. 30) जागेवरच मृत्यू झाला आहे. उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करणार्‍या या श्रमिक महिलेचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने महावितरण कंपनी विरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनेबाबत महावितरण कंपनीचा किसान सभेनेही तीव्र धिक्कार केला आहे.

विजेच्या तारा वेळीच आजूबाजूच्या झाडाच्या फांद्यांपासून दूर न केल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. अकोले तालुक्यात वीज महामंडळाचे वाहक पोल अत्यंत चुकीच्या पद्धतीने शेतामधून तसेच रस्त्याच्या कडेने झाडांच्या फांद्यामधून उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे दैनंदिन काम करत असताना शेतकरी व श्रमिक कुटुंबामध्ये अशाप्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत.

महावितरण कंपनीने तातडीने या महिलेच्या घरच्यांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य द्यावे, महावितरण कंपनीच्या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, तालुक्यात अशाप्रकारे धोकाग्रस्त असणार्‍या वीज तारा झाड व शेत पिकांपासून सुरक्षित अंतरावर उभ्या कराव्यात. शेतांमधून वाहक तारकांना पडलेले झोळ तातडीने दुरुस्त करावेत व कमकुवत झाल्याने कधीही तुटू शकतील अशा तारा तातडीने बदलून द्याव्यात अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, ज्ञानेश्वर काकड, एकनाथ गिर्‍हे, भीमा मुठे यांनी केली आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 116509

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *