अकोलेत किसान सभेचे दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरूच विविध मागण्यांसाठी 26 नोव्हेंबरला काढणार विराट मोर्चा


नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना प्रतिएकर 50 हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे, गायरान जमिनी ताबेदारांच्या नावे कराव्यात, वन जमिनी कसणारांच्या नावे कराव्यात, कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी पूर्ण करावी, पात्र गरीबांचा दारिद्र्यरेषेच्या यादीत समावेश करावा आदी मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अकोले तहसील कार्यालयासमोरही शेतकर्‍यांनी गुरुवारपासून (ता.24) धरणे आंदोलन सुरु झाले असून दुसर्‍या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, 26 नोव्हेंबरला विराट मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

अकोले तालुक्यातील विठा येथील 35 आदिवासी कुटुंब वर्षानुवर्षे गायरान जमिनीत राहत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचे कारण देत या आदिवासींना जमिनीवरून निष्कासित करण्याची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. शासन व प्रशासनाने या आदिवासी गरीब कुटुंबांचे योग्य जागा देऊन पुनर्वसन करावे. अन्यथा गायरान जमिनींवरील त्यांचा ताबा कायम करावा या मागणीसाठी ही कुटुंबे बेमुदत धरणे आंदोलनात सामील झाली असून कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत.

राज्यभर शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून दोनवेळा कर्जमाफी झाली. अकोले तालुक्यातील पिंपरकणे, शेलविहिरे, मान्हेरे, टिटवी, तेरुंगण, बाबुळवंडी इत्यादी गावांतील आदिवासी शेतकर्‍यांचे थकीत पीककर्ज मात्र या दोन्ही कर्जमाफी योजनांच्या याद्यांमधून वगळून टाकण्यात आली आहे. आता या गरीब आदिवासी शेतकर्‍यांची कर्ज वसुली सुरु असून इतर शेतकर्‍यांना कर्जमाफी देत असताना या आदिवासींना मात्र बँकांनी कर्ज वसुलीसाठी न्यायालयात खेचले आहे. किसान सभेने या शेतकर्‍यांची बाजू घेत आंदोलन सुरु केले असून हे सर्व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहे. या आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, प्रकाश साबळे, ज्ञानेश्वर काकड, मथुराबाई बर्डे, भाऊसाहेब मेंगाळ, बहिरु रेंगडे, किसन मधे, दिलीप हिंदोळे, बाळू मधे, देवराम उघडे, शांताराम पथवे, वसंत वाघ, नाथा जाधव आदी सहभागी झाले आहेत.

Visits: 100 Today: 1 Total: 1108987

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *