महिलांचे भय इथे संपत नाही..! संगमनेर बसस्थानक; सात तोळ्यांचे गंठण लंपास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैभवशाली शहरातील अतिशय देखण्या ठरलेल्या संगमनेर बसस्थानकाला चोरट्यांनी लावलेले ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बसस्थानकाच्या नूतनीकरणानंतर अनेक पोलीस निरीक्षक आले आणि गेले, मात्र त्यातील एकालाही बसस्थानक चोरट्यांपासून मुक्त करता आले नाही. त्याचा परिणाम प्रवाशी महिलांमध्ये पोलिसांपेक्षा चोरट्यांचीच अधिक भीती निर्माण झाली असून ‘भय इथे संपत नाही’ असे म्हणायची वेळ महिलांवर आली आहे. शनिवारीही महिलांच्या दहशतीत भर घालणारी आणखी एक घटना घडली असून यावेळी चोरट्याने तब्बल साततोळे वजनाचे गंठण लांबवण्याचा प्रकार केला आहे. या घटनेने संगमनेर बसस्थानकात येणार्‍या प्रवाशांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून पोलिसांच्या नावाने बोटं मोडली जात आहेत.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना शनिवारी (ता.5) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात घडली. या घटनेत मूळ अकोल्याची रहिवाशी असलेल्या निर्मला जयराम आंबरे (वय 71) ही वृद्ध महिला अकोले बसची वाट बघत फलाटावर उभी होती. त्याचवेळी चोरट्याने सावज हेरुन त्यांच्यावर नजर टिकवली. संगमनेर बसस्थानक आणि प्रवाशांचा ऐवज चोरीच्या घटना सर्वश्रूत असल्याने या महिलेलाही त्याबाबत पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी बसमध्ये चढण्यापूर्वीच आपल्या गळ्यातील सात तोळे वजनाचे आणि आजच्या स्थितीत जवळपास साडेपाच लाख रुपये बाजार मूल्य असलेले सोन्याचे गंठण काढून आपल्या जवळील पिशवीत ठेवले.


सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अकोल्याकडे जाणारी बस फलाटावर येताच त्यात बसण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्या गर्दीतून वाट काढीत आणि आपल्या जवळची पिशवी सांभाळीत निर्मला आंबरे या देखील बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागल्या. दाटीवाटी आणि रेटारेटीतून कशीबशी वाट करुन अखेर त्यांनी बसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पिशवीतील आपला ऐवज सुरक्षित आहे का? याची चाचपणी केली असता त्यांना धक्काच बसला. बसमध्ये चढत असतानाच त्यांच्या ऐवजावर आधीपासूनच नजर खिळवून बसलेल्या चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतील सोन्याचे गाठोडे आणि त्यासोबत ठेवलेली चारशे रुपयांची रोकड लांबवली.


हा प्रकार पाहून रडू कोसळलेल्या त्या वृद्ध महिलेने सहप्रवाशांना याची कल्पना देत घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र तो पर्यंत चोरटा आपला कार्यभाग उरकून तेथून ‘गायब’ झाला होता. त्यावर काहींनी त्यांना ताबडतोब पोलीस ठाण्यात जावून तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र या प्रकाराने ती वृद्ध महिला प्रचंड भेदरल्याने त्यांनी तत्काळ तक्रार देण्याऐवजी अकोल्याला जावून दुसर्‍या दिवशी रविवारी (ता.6) सायंकाळी याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संगमनेर बसस्थानकात महिलांचे दागिने सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे.

चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी बसस्थानकात पूर्णवेळ महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा फार्स राबवला होता. त्यामुळे सुरुवातीच्या कालावधीत बसस्थानकातून होणार्‍या सर्वप्रकारच्या चोर्‍यांना पायबंद बसला होता. मात्र नंतर पोलीस कर्मचारी असतानाही चोर्‍या सुरु झाल्याने पुन्हा चोरट्यांची दहशत जमा होवू लागली. त्यातच स्थानकातील काही फेरीविक्रेत्यांनी पोलिसांचे चोरट्यांशी सोटेलोटे असल्याची बाबही चर्चेत आणली. तेव्हापासून संगमनेर बसथानकाची अवस्था दागिने परिधान करुन मिरवणार्‍या महिलांसाठी भीतीदायक बनली आहे.

Visits: 452 Today: 4 Total: 1103574

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *