घ्या आता! चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातूनच रिक्षा लंपास!! संगमनेर पोलिसांची नाचक्की; जेथे पोलीस ठाणेच असुरक्षित, तेथे सामान्यांचे काय?
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा गुन्हेगारांवरील धाक पूर्णतः संपुष्टात आलाय की काय अशी शंका निर्माण करणार्या एकामागून एक घटना घडत असतांना आतातर पोलिसांची पुरती नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. एरव्ही शहराच्या विविध भागात धाडसी चोर्या करुन पोलिसांना आव्हान देणार्या चोरट्यांनी आता चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच हात साफ केला असून महसूल विभागाने जप्त केलेल्या दोन रिक्षा लांबविल्या आहेत. या घटनेने प्रभारीराज असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पोलीस अधीक्षक एखादी गंभीर घटना घडण्याची तर प्रतीक्षा करीत नाहीत ना? असे सवाल आता शहरातून विचारले जावू लागले आहेत. विशेष म्हणजे सध्या शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह पोलीस उपअधीक्षकही प्रभारीच असल्याने सध्याची स्थिती त्यांच्यासाठी ‘रामराज्य’ ठरत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी घडलेल्या या धक्कादायक घटनेची गुरुवारी (ता.24) रात्री उशिराने आपल्या दप्तरी नोंद केली आहे. या प्रकरणी कामगार तलाठी तुळशीराम लांडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारी विविध वाहने पकडून ती कारवाईसाठी तहसील व पोलीस ठाण्याच्या ‘सामायिक’ आवारासह पोलीस वसाहतीतही उभी केली आहेत. गेल्या दहा दिवसांपूर्वी 13 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत त्यातील पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या दोन रिक्षा मात्र कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी संधी साधून तेथून चोरुन नेल्या आहेत.
हा प्रकार महसूल विभागाच्या लक्षात येण्यासाठी दहा दिवस लागले. गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर तहसीलदारांच्या आदेशाने तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाईसाठी जप्त करुन या परिसरात उभ्या करण्यात आलेल्या एम.एच.17/एच.471 व एम.एच.17/एन.1626 या दोन रिक्षा चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार चक्क पोलीस आणि महसूलच्या संयुक्त आवारातच घडल्याने या परिसरात पोलिसांचा चोवीस तास राबता असतांनाही चोरट्यांनी चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोरच उभ्या असलेल्या रिक्षा लांबविल्याने शहर पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
सध्या शहर पोलीस ठाण्याचा पदभार राजेंद्र भोसले यांच्याकडे असून गणेशोत्सव पार पडल्यानंतर लागलीच त्यांनी आपली येथून बदली व्हावी असा विनंती अर्ज पोलीस अधीक्षकांना पाठवला आहे. त्यांच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने ते शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील अवैध धंद्यांनी पुन्हा विस्तार केला असून चोरीच्या घटना तर नियमितपणे घडतच आहेत. त्यांच्यापूर्वी पोलीस ठाण्याचा पदभार असलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचीही येथील कारकीर्द अत्यंत निष्क्रिय आणि हप्तेखोरीने बरबटलेली राहिल्याने संगमनेरच्या सामाजिक सुरक्षेची घडी अस्तव्यस्त झालेली होती, त्यांच्यानंतर प्रभारी म्हणून सूत्रे घेणार्या पो. नि. राजेंद्र भोसले यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याने कधी नव्हे इतकी शहराची कायदा व सुव्यवस्था विस्कटल्याचे चित्र आज दिसत आहे.
यापूर्वी तत्कालीन उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांच्या शोध कामगिरीमुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांचे तपास लागले. त्यांची नागपूरला बदली झाल्यानंतर संगमनेर उपविभागाचा तात्पुरता पदभार शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी दोन दिवस शहरातील सगळे अवैध धंदे ‘बंद’ करण्याचे फर्मान धाडल्यानंतर आता ऐच्छिक स्थिती निर्माण झाल्याने शहरात सर्वकाही आलबेल झाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे संगमनेरचा अतिरिक्त पदभार असला तरीही ते शिर्डी सोडून दिवसभर संगमनेरातच ठाण मांडून बसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेरचा विषय गांभीर्याने घेवून येथे धाडसी अधिकार्यांची नियुक्ती करण्याची गरजही यातून व्यक्त होवू लागली आहे.